अज्ञात इसमाने महिलेवर झाडली गोळी

गोळीबारापर्यंत गुन्हेगारांची मजल

शहरात पाकीटमारी, चैन स्नॅचिंग असे प्रकार नित्याने घडतात. परंतु चोरट्यांची मजल आता गोळीबारापर्यंत गेल्यामुळे चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही, अशी चर्चा कट्ट्याकट्ट्यावर होत आहे. त्यामुळे या चोरट्यांच्या मुसक्‍या आवळणे हे पोलिसांसमोर एक आव्हान आहे. 

कोपरगाव – शहरातील एका महिलेवर अज्ञात इमसाने गोळी झाडली. सुदैवाने निशाना चुकल्याने महिलेचा जीव वाचला. ही घटना बुधवारी (दि. 17) रात्री पावणेबाराच्या सुमारास घडली. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माला दीपक घोंगडी (वय 48) या बुधवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास नेहमीप्रमाणे किशोर वाइन्स हे आपले दुकान बंद करून स्कुटीवरून घरी निघाल्या होत्या. त्या खुल्या नाट्यगृहाजवळ आल्या असता अज्ञात तरुणाने तुझी स्कुटी बाजूला घे, असे म्हणत घोंगडी यांच्यावर पिस्तूल ताणले. घोंगडी यांनी आरोपीच्या हाताला खालून मारल्यामुळे पिस्तुलातून हवेत गोळीबार झाला. आरोपीच्या हातावर वार केल्याने घोंगडी या थोडक्‍यात बचावल्या. गोळीबार झाल्यामुळे आरोपी तेथून पळून गेला.

माला घोंगडी यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच आज श्रीरामपूरचे अतिरिक्त पोलीस उपअधीक्षक दीपाली काळे, शिर्डी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचैरे, उपनिरीक्षक मोहन भोसल, उपनिरीक्षक भरत नागरे यांनी घटनास्थळासह परिसराची पाहणी केली. यावेळी काडतूस जप्त करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.