राजीव सक्‍सेना याला व्हायचंय माफीचा साक्षीदार 

नवी दिल्ली – ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणातील जामीनावर सुटलेला संशयित राजीव सक्‍सेना याला माफीचा साक्षीदार व्हायचे आहे. त्याने दिल्लीच्या न्यायालयात तसा अर्ज करून आपल्याला माफीचा साक्षीदार करण्याची अनुमती मागितली आहे. त्याच्या अर्जावर न्यायालयाने ईडीचा प्रतिसाद मागवला आहे. आपण स्वत:हून यासाठी साक्षीदार म्हणून काम करण्यास तयार आहोत पण या प्रकरणातून आपल्याला पुर्ण माफी दिली जावी अशी आपली अट आहे असे त्याने आपल्या अर्जात म्हटले आहे. त्याच्या अर्जावर उद्या निर्णय होण्याची शक्‍यता आहे.

आपल्याकडे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपण पुर्ण सहकार्य केले असून या व्यवहारातील सारी माहिती आपण साक्षीदार म्हणून कोर्टापुढे सांगण्यास तयार आहोत असेही त्याने म्हटले आहे. सक्‍सेना याला वैद्यकीय कारणास्तव नुकताच जामीन मंजुर करण्यात आला आहे. त्याला रक्ताचा कर्करोग झाला असून त्यासाठी त्याला सातत्याने वैद्यकीय मदत घ्यावी लागते. एम्स रूग्णालयाकडून मिळालेल्या सर्टिफिकेटच्या आधारे त्याला हा जामीन मंजुर करण्यात आला आहे. दुबईतून त्याला हद्दपार करण्यात आल्यानंतर 31 जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली होती. भारताचे माजी हवाईदल प्रमुख एस.पी त्यागी हेही या हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी असून त्यांनाही जामीन मंजुर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.