संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून सुरु होणार ?

सरकारी सुत्रांनी दिले संकेत

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 18 नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. हे अधिवेशन एक महिना चालणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारमधील सूत्रांनी याविषयीचे संकेत दिले आहेत. हिवाळी अधिवेशनाबाबत अद्याप सरकारकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही. परंतु, हिवाळी अधिवेशनाच्या तारखेवर निर्णय घेण्यासाठी झालेल्या संसदीय प्रकरणांवरील कॅबिनेट समितीच्या (सीसीपीए) बैठकीनंतर सूत्रांनी 18 नोव्हेंबरपासून सुरु होण्याचे संकेत दिले आहेत.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख आहेत. यासंबंधी अधिकृत घोषणा पुढील आठवड्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली जाण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळी अधिवेशनाचे सत्र 18 नोव्हेंबरपासून सुरु होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सुरु राहू शकते. मागील 2 वर्षे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबरला सुरु झाले होते आणि ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरु होते.

सरकार आगामी अधिवेशनात अनेक विधेयकांबरोबर दोन महत्वाच्या अध्यादेशांचा कायदा तयार करण्याच्या योजनेवर काम करत आहे. एक अध्यादेश सप्टेंबरमध्ये प्राप्तीकर अधिनियम, 1961 आणि वित्त अधिनियम, 2019 मध्ये दुरुस्तीसाठी जारी केले होते. सरकारने अर्थव्यवस्थेतील मरगळ कमी करण्यासाठी नवी आणि देशातील उत्पादकांसाठी कॉर्पोरेट कर कमी केले आहेत. दुसरा अध्यादेशही सप्टेंबरमध्ये जो ई-सिगारेट आणि अशाच पद्धतीच्या उपकरणांच्या विक्री, उत्पादन आणि साठ्यावर प्रतिबंधाशी संबंधित आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.