मुळशीतील विजयी उमेदवार नॉट रिचेबल

  • सरपंच पदाच्या स्वप्नपूर्तीसाठी गुप्त बैठका

हिंजवडी – मुळशी तालुक्‍यातील 45 ग्रामपंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आहेत. संपूर्ण गावाचे आता सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण जाहीर झाले नसताना देखील अमुक-अमुक आरक्षण पडल्यास कोणाला सरपंच करायचे यासाठी अनेक ठिकाणी नेत्यांच्या दरबारात नवनिर्वाचित सदस्यांच्या बैठक सुरू आहेत. अक्षरशः मध्यरात्रीपर्यंत गुप्त बैठका होत असल्याचे सांगितले जात आहे.

ज्या गावांमध्ये सरपंच पदासाठी मोठी चुरस होणार आहे तेथील उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत. काहीजण सहलीला तर काहीजण देवदर्शनाला गेले असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ऐकायला मिळत आहे. यापूर्वी निवडणुकीच्या अगोदर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत होत होती. परंतु यावर्षीपासून निवडणूक झाल्यानंतर आरक्षण सोडत होणार आहे. मुळशी तालुक्‍यात निवडणुकीपूर्वी झालेली आरक्षण सोडत रद्द झाली असली तरी आता नव्याने होणार असलेल्या आरक्षण सोडती जेमतेम पूर्वीप्रमाणेच पडतील असे गृहीत धरून सध्या सरपंच पदाच्या शर्यतीतील उमेदवार पायाला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत.

गाव व तालुका पातळीवर सरपंच पद हे मोठे प्रतिष्ठेचा विषय मानला जात असल्याने बहुमत आपल्या बाजूने करून घेण्यासाठी उमेदवारांची जुळवाजुळव व मनधरणी केली जात आहे. निवडून आलेला एखादा सदस्य ऐकत नसेल तर त्याला नेत्यांच्या दालनात नेऊन त्याला प्रलोभने दाखवून त्याची समजूत काढली जात आहे.

काही उमेदवारांचा तर चांगलाच फुटबॉल होत आहे. एकंदरीत अजून आरक्षण सोडतीची तारीख निश्‍चित झाली नसली तरी अनेक नाट्यमय घडामोडी सध्या मुळशी तालुक्‍यात पहायला मिळत आहेत. त्यामुळे आरक्षण सोडत कधी होणार व काय आरक्षण निघणार यावर पुढील भवितव्य ठरणार असल्याने उमेदवार फोडाफोडी करण्यासाठी काही प्रमाणात घोडेबाजार ही पाहायला मिळणार यात शंका नाही

मलाबी चानस हवा…
ज्या गावात स्पष्ट बहुमत आले आहे, त्या ठिकाणी मलाबी चानस हवा.. असे म्हणत इच्छुक उमेदवार पैनल प्रमुखाच्या घरी सकाळ सकाळीच हजेरी लावत आहेत. तर ज्या गावामध्ये काठावर बहुमत आहे. त्या ठिकाणी उमेदवार फोडण्यासाठी नवनवीन डाव टाकले जात आहेत. आश्वासनांची खैरात केली जात आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचाही वापर होताना दिसत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.