कोपरगाव – कोपरगाव शहरात वॉईन शॉप चालक दिलीप शंकर गौंड यांना अज्ञात चोरट्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून तब्बल 5 लाखांना लूटले. ही घटना शुक्रवारी (दि.11) रात्री दहाच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील किशोर वाईन्स शॉपचालक दिलीप शंकर गौंड (रा. निवारा, कोपरगाव) हे शुक्रवारी रात्री 10 वाजता आपले दुकान बंद करून दिवसभरात दारू विक्रीतून जमा झालेले 4 लाख 73 हजार 900 रुपये स्कूटीच्या डिकीत ठेवून निवारा परिसरातील आपल्या घराकडे दुकानातील सचिन साळवे नावाच्या एका कामगारासमवेत चालले होते. ते शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसरातील भाई भाई मोटार गॅरेज जवळ आले असता, पाठीमागून विना क्रमांकाच्या दोन मोटारसायकलवरुन अज्ञाच चार चोरटे आले. त्यांनी त्यांनी गौंडे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या जवळील रोख 4 लाख 73 हजार 900 रुपये, एक टॅब, 2 मोबाइल, असा अंदाजे 5 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
त्यानंतर गौंड यांनी या घटनेची माहिती कोपरगाव पोलिसांना दिली. गौंडे यांच्या तक्रीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चोरट्यांचा तपास करीत आहेत.
दरम्यान, शहरात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, रात्रीच्या वेळी मोटारसायकलवर येवून रस्त्यावर लुटण्याचा घटना सातत्याने घडत आहेत. गेल्याच आठवड्यात साई सिटी परिसरातील रचना पार्क या हाय प्रोफाइ परिसरात एका पतसंस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला व त्यांच्या पत्नीला लुटण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. मोटारसायकलवरुन रात्री हे पती-पत्नी घरी जात असताना अचानक पाठीमागून दोन चोरटे मोटारसायकलवरुन जवळ आले.
त्यांनी संबंधित व्यक्तीच्या पत्नीच्या खांद्याला आडकवलेली पर्स ओढून नेली. यावेळी या पती-पत्नीने त्यास विरोध करत या चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र या चोरट्यांनी त्यांच्यावर दगडांचा मारा केला. त्यामुळे घाबरलेल्या पती-पत्नीने घर गाठले. शहरात सततच्या होणाऱ्या लुटमारीच्या घटनांवर नित्यंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांनी सतर्क राहून चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.