जीनिव्हा -भारतात करोना विषाणूचा हाहाकार दिसून येत आहे. करोना संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. आता कोविड-19चा नवा स्ट्रेन प्रथम भारतात आढळला. आता हा नवा स्ट्रेन जगभरातील अन्य देशांमध्ये पसरू लागला. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी सांगितले की, भारतातील करोनाचा नवा प्रकार ज्याच्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. आता हा करोनाचा नवा व्हेरिएंट 44 देशांत पोहोचला.
भारतात मोठ्या प्रमाणात होणारी रुग्णवाढ आणि मृत्यू यामुळे बी.१.६१७ तसंच इतर उपप्रकाराच्या भूमिकेसंबंधी अनेक प्रश्न निर्माण झाल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, “नुकतंच भारतातील स्थितीसंबंधी करण्यात आलेल्या अभ्यासात अनेक गोष्टी करोनाचा वेगाने प्रसार होण्यासाठी कारणीभूत असल्याचं दिसत आहे. यामध्य करोनाचे वेगवेगळे उपप्रकारदेखील करोनाचा फैलाव करण्यासाठी कारणीभूत ठरले आहेत. याशिवाय मोठ्या प्रमाणात गर्दी झालेले अनेक धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमही जबाबदार आहेत. यावेळी करोनासंबंधित नियमांचं कोणतंही पालन न करणं एक कारण होतं. दरम्यान भारतात करोनाचा प्रसार होण्यामागे यापैकी कोणती गोष्टी किती जबाबदार ठरली हे व्यवस्थित समजू शकलेलं नाही”.
दरम्यान, हा करोनाचा नवा व्हेरिएंट मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतात सापडला होता. आतापर्यंत 4500 पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये भारतीय व्हेरिएंट सापडले आहेत. विषाणूचा हा भारतीय प्रकार ब्रिटनमध्ये सर्वाधिक प्रमाणात सापडला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने बी.1.617 जाहीर केले. आपल्या म्युटेशन आणि वैशिष्ट्यांमुळे चिंतेचा विषय झाला आहे म्हणूनच प्रथम ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 च्या इतर तीन प्रकारांच्या व्हेरिएंटमधील सूचित त्याला समाविष्ट केले गेले आहे.
भारताच्या या नवीन प्रकाराला वैज्ञानिकदृष्ट्या बी.1.617 असे नाव देण्यात आले आहे. हा विषाणू दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये आढळणाऱ्या दोन वेगवेगळ्या विषाणूंची आवृत्ती असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले आहे.