वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात बुधवारी होणाऱ्या महाभियोगाच्या सुनावणीमध्ये व्हाईट हाऊस सहभागे होणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. या सुनावणीमध्ये ट्रम्प प्रशासनाने सहभागी होणे अपेक्षित नाही. या सुनावणी दरम्यान साक्षीदारांची निश्चिती अद्याप व्हायची आहे.
न्यायिक समितीकडून ट्रम्प यांच्याविरोधातील या महाभियोगासाठी अतिरिक्त सुनावणी घेतली जाईल की नाही हे अद्याप निश्चित नाही, असे व्हाईट हाऊसचे वकिल पॅट सिपोलोन यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या न्यायिक समितीच्या अध्यक्षांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. या महाभियोगाच्या सुनावणीची दुसरी फेरी बुधवारपासून सुरू होणार आहे.
महाभियोगाअंतर्गत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यासाठी, अमेरिकी कॉंग्रेसची समिती आज डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच्या महाभियोग चौकशी अहवालाचा आढावा घेणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बंद दाराआड आणि सार्वजनिकरित्या सुनावणी घेत असलेली समिती या चौकशी अहवालावर चर्चा करेल. येत्या मंगळवारपर्यंत या अहवालावर चर्चा आणि नंतर मतदान होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सभागृहाची गोपनीय चौकशी समिती महाभियोगाअंतर्गत आरोपांची निश्चिती करणार आहे.