वेलिंग्टन – न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिज डावाच्या पराभवाच्या छायेत आहे. पहिल्या डावात फॉलोऑन मिळाल्यानंतर रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात 6 बाद 244 धावा झाल्या असून ते अद्याप 85 धावांनी पिछाडीवर आहेत.
न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 460 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर काएल जेमिसन व टीम साऊदी यांच्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी वेस्ट इंडिजचा पहिला डाव अवघ्या 131 धावांवर संपवला व त्यांना फॉलोऑन दिला होता. दुसरा डाव सुरु केल्यावर मात्र, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी केली होती. त्यांच्या जॉन कॅम्बेल व शेमरन ब्रुक्स यांनी चांगली खेळी केली. कॅम्बेलने अर्धशतकी खेळी केली मात्र, त्यानंतर पुन्हा त्यांची घसरगुंडी उडाली.
#NZvWI Stumps ✅ pic.twitter.com/sHYpI1cSVQ
— ICC (@CricketTube95) December 13, 2020
कर्णधार जेसन होल्डरने नाबाद अर्धशतकी खेळी करताना डाव सावरण्याचाही प्रयत्न केला. परंतु समोरून अन्य फलंदाजांनी निराशा केली. यावेळी यष्टीरक्षक जोशुआ डिलिस्व्हा याने मात्र, त्याला साथ देत संघाचा डावाचा पराभव टाळण्यासाठी बहुमोल भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा होल्डर 60 तर, डिलिस्व्हा 25 धावांवर खेळत आहेत.
डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप 85 धावांची गरज आहे. सामन्याचे दोन दिवस बाकी असून यजमान न्यूझीलंडचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. न्यूझीलंडकडून पहिल्या डावातील हिरो ठरलेल्या जेमिसनने याही डावात आपल्या भेदक गोलंदाजीचे दर्शन घडवले. त्याला ट्रेन्ट बोल्टनेही सुरेख साथ दिली.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव – 460 धावा. वेस्ट इंडिज पहिला डाव – 56.4 षटकांत सर्वबाद 131 धावा. (जेरेमी ब्लॅकवूड 69, काएल जेमिसन 5-34, टीम साऊदी 5-32). वेस्ट इंडिज दुसरा डाव – 65.4 षटकांत 6 बाद 244 धावा. जॉन कॅम्बेल 68, शेमरन ब्रुक्स 36, जेसन होल्डर खेळत आहे 60, शेमरन ब्रुक्स खेळत आहे 25, ट्रेन्ट बोल्ट 3-75, काएल जेमिसन 2-43).