पवना धरण पूर्ण भरल्याशिवाय पाणी कपात रद्द होणार नाही

नऊ महिने पुरेल एवढे पाणी

धरणात सध्या असलेला पाणीसाठा लक्षात घेता पाणी कपात मागे घेण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर, पाणी कपात मागे घेण्यासाठी गटनेत्यांची बैठक घेऊन निर्णय घेण्याचे विचाराधीन आहे. तसा निर्णय झाल्यास दररोज सरासरी 480 दशलक्ष लिटर इतके पाणी महापालिकेला शहरासाठी सोडावे लागणार आहे. त्यानुसार आजचा पाणीसाठा साडेआठ ते नऊ महिने पुरेल. पावसाने दडी मारल्यास पुढील वर्षी ऐन उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनाला पुरेशी दक्षता घ्यावी लागणार आहे.

पिंपरी  – पवना धरण पूर्ण भरल्यानंतरच शहरात सध्या सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्याबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे महापौर राहुल जाधव यांनी गुरूवारी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. त्यामुळे काही नेते मंडळींनी पुन्हा एकदा पाणी कपात रद्द करण्याचा सूर लावला आहे. परंतु पाणीसाठ्यात वाढ झाली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा तब्बल 10.83 टक्‍क्‍यांनी कमी आहे. यामुळे पाणी कपात लगेचच रद्द करणे घाईचा निर्णय ठरु शकतो.

शहरामध्ये सध्या दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि पवना धरण क्षेत्रात पावसाने जोर पकडला आहे. सध्या धरण 86.34 टक्के इतके भरले आहे. धरण क्षेत्रामध्ये चालू वर्षी आत्तापर्यंत 1939 मिलिमिटर इतका पाऊस पडला. गतवर्षी 2128 मिलिमिटर इतका पाऊस झाला होता. गतवर्षी आजच्या तारखेला धरण क्षेत्रामध्ये 97.17 टक्के इतका पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदा 10.83 टक्के इतका पाणीसाठा कमी आहे.

गतवर्षीच्या पुनरावृत्तीचे भय
मावळ परिसरात नेहमीच पावसाचा जोर खूप अधिक असतो. स्थानिकांनुसार पूर्वी धरण पावसाळ्यात दोनवेळा शंभर टक्‍के भरत असे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये कोरड्या दिवसांचे प्रमाण वाढले आहे. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने ओढ दिली असल्याने यंदा ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचे संकट आले होते. यावर्षी जर गतवर्षीची पुनरावृत्ती झाल्यास पुन्हा पाणीटंचाई येऊ शकते. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने पूर्वीचा इशारा दिला होता की, यावर्षीच्या मॉन्सूनवर अल निनोचे सावट असण्याची शक्‍यता आहे.

ही शक्‍यता मॉन्सूनच्या आगमनात काहीशी खरी होताना दिसली होती. यंदा पाऊस उशिरा आला. आज जो काही धरणात पाणीसाठा आहे तो जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आहे. बाकी बहुतेक दिवस हे कोरडे गेले . यात आणखी कोरड्या दिवसाची वाढ झाली असती, ऐन पावसाळ्यात पाणी संकट ओढावले असते.

पवना धरण अद्याप पूर्ण भरलेले नाही. शहरवासियांच्या भावना लक्षात घेऊन धरण पूर्ण भरल्यानंतर बैठक घेऊन पाणी कपात मागे घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

– राहुल जाधव, महापौर, पिंपरी-चिंचवड

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.