नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे थैमान घातला आहे. त्यातच राजधानी दिल्लीत आलेल्या चौथ्या लाटेने तर तिथली संपूर्ण आरोग्य व्यवस्थाच कोलमडून गेली आहे. या सर्वात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दिल्लीत सरोज हॉस्पिटलमधील जवळपास ८० डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
दिल्लीत सरोज हॉस्पिटलमध्ये आता सर्व ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या एकूण ८० डॉक्टरांपैकी १२ जण रूग्णालयात दाखल आहेत. तर इतर सर्व डॉक्टर्संना होम क्वारटाईन करण्यात आले आहे. हॉस्पिटलचे वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ. एके रावत यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना संकटात ही चिंताजनक बाब आहे की, इतके डॉक्टर हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
दरम्यान, राजधानी दिल्लीत सुद्धा कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन एक आठवडा वाढविण्यात आले आहे. १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन असणार असून यामध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीत गेल्या १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र, हा लॉकडाऊन उद्या १० मे रोजी संपणार आहे. परंतू दिल्लीतील कोरोना स्थिती पाहता हा लॉकडाऊन आणखी एक आठवडा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आठवडाभराच्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो सेवाही बंद करण्यात येणार आहे, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे.