महर्षीनगर, गुलटेकडी परिसरात जनजागृतीऐवजी स्वत:चाच प्रचार
महर्षीनगर – स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत प्रभाग क्रमांक 28 महर्षीनगर गुलटेकडी परिसरात जनजागृतीसाठी भिंतीवर चित्रे काढण्यात येत असून यावर अंदाजे 15 लाख रुपये खर्च करण्यात येत आहे. परंतु, या भिंती रंगविताना नगरसेवक स्वतःची प्रसिद्धी करून घेत आहेत, अशा प्रकारांबाबत परिसरातील नागरिकांत नाराजीचा सूर आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी भिंती रंगविल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांमुळे सुशोभित केलेल्या या भिंती झाकल्या जात आहेत, यामुळे पालिकेकडून भिंती रंगविण्याच्या कामात पैशांची उधळपट्टी होत असून यातून माननियांची फुकटची प्रसिद्धी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्वारगेट येथील उड्डाण पुलावर काही महिन्यांपूर्वी जनजागृतीसाठी अशाच पद्धतीने काढलेली चित्रे धुळीने व घाणीने पूर्ण अस्पष्ट झाली असून अशी उदाहरणे असताना माननीयांच्या हट्टापायी त्यांची नावे पूर्ण भिंती भर मोठ्या अक्षरात रंगविण्याचे काम सुरू आहे, हा प्रकार थांबविण्यात शासकीय अधिकारी हतबल असल्याचे चित्र आहे.
पूर्ण भिंतीच्या भिंतीच फक्त स्वतःच्या मोठ्या आकाराच्या नावाने लिहून नगरसेवक हे जनसेवक म्हणून काम करतात की स्वत:चा प्रचार करतात, अशी चर्चा नागरिकांत आहे.
प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडविण्यापेक्षा अशा प्रकारे स्वतःच्या नावाची प्रसिद्धी करण्यातच नगरसेवक मग्न आहेत. नागरिकांकडून उपलब्ध होणारा कराचा वापर जनहितार्थ होणे गरजेचे असताना हाच पैसा भिंती रंगविण्याच्या कामासाठी होत असल्याने असा प्रकार थांबविणे गरजेचे असून याबाबत राजकीय पक्षांनीच पुढाकार घेऊन पक्षांतर्गत शिस्त लावणे व महानगरपालिकेत नियम होणे गरजेचे आहे, अन्यथा नागरिकांकडून मिळणारा कराचा पैसा अशाच पद्धतीने वाया जाईल, यावर प्रशासकीय वचक असावाच असे, नागरिकांचे म्हणणे आहे.
सदर प्रभागात मी पंचवीस वर्षे नगरसेवक म्हणून काम केले. अनेक महत्त्वाची विकासकामे केलेली आहेत. मात्र, संकल्पना म्हणून अशा पद्धतीने माझे नाव कोठेही लिहिण्याचा अट्टहास मी केला नाही. नैतिकतेने सर्वसामान्य नागरिकांच्या पैशातून अशी उधळपट्टी करणे चुकीचे आहे. हा चुकीचा पायंडा पडत असून हे थांबणे गरजेचे आहे.
– अभय छाजेड, माजी नगरसेवक
विकासकामांसाठी संकल्पना म्हणून नगरसेवकांची नावे लिहिताना ती किती आकाराची असावीत याबाबत दुर्दैवाने कोणताही नियम नसल्याने नगरसेवक हे फुकटची प्रसिद्धी जनतेच्या पैशातून मिळवितात. नागरिकांच्या पैशातून स्वतःची प्रसिद्धी करण्याचे उद्योग सुरू आहेत. पुन्हा निवडणुकीच्या काळात ही नावे पुसण्यासाठी पुन्हा नागरिकांचेच पैसे वाया जातात व मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
नगरसेवकांनी जनतेच्या कररूपी पैशातून स्वतःच्या नावाची प्रसिद्धी करण्याची हौस अशा पद्धतीने करणे हा मतदारांचा अपमान आहे. नगरसेवकांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वखर्चाने स्वतःच्या मालमत्तेवर अशा पद्धतीने मोठ्या अक्षरात त्यांची प्रसिद्धी करावी.जनतेच्या पैशाची अशीच उधळपट्टी सुरू राहिल्यास जागृत मतदार त्याची परतफेड भविष्यात नक्की करेल.
– बाळासाहेब रूणवाल, नागरिक
शहरातील अन्य प्रभागात रंगविण्यात आलेल्या भिंतीवरही इतर नगरसेवकांनी याच प्रकारे मोठ्या आकारात नावे लिहिली आहेत. त्यामुळे त्याच नियमानुसार आम्हीही नावे टाकलेली आहेत.
– राजश्री शिळीमकर, नगरसेविका
स्वच्छता जनजागृतीसाठी प्रभाग क्रमांक 28 मध्ये भिंतीवर चित्र काढण्यासाठी अंदाजे पंधरा लाख रुपये खर्च करण्यात आला असून खन्ना दवाखान्याजवळ भिंतीवर मोठ्या आकाराच्या लिहिलेली नगरसेवकांची नावे असलेले काम हे विकासनिधीतून करण्यात आले आहे. नगरसेवकांची नावे लिहिताना त्याचा आकार किती असावा, याबाबतच्या नियमांबाबत माहिती नाही.
– अजय खामकर, कनिष्ठ अभियंता, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय