#प्रभात_दीपोत्सव_२०२० : ‘द वॉल’चे शिलेदार चमकताहेत…

– अमित डोंगरे


“क्रायसिस मॅनेजर’ किंवा “मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून सुपरिचित असलेला माजी कसोटी क्रिकेटपटू व माजी कर्णधार राहुल द्रविडच्या हाती भारतीय क्रिकेटचे भविष्य सोपवण्याचा बीसीसीआयचा निर्णय किती सार्थ ठरला, ते यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सिद्ध झाले. भारतीय संघाला “सेकंड बेंच’ देताना द्रविडने घेतलेली मेहनत प्रत्यक्ष अमिरातीच्या विविध मैदानांवरही स्पष्ट दिसली. भारताच्या युवा संघातील तसेच 19 वर्षांखालील संघातील नवोदित खेळाडू यंदाची आयपीएल गाजवताना पाहिल्यावर द्रविडच्या ज्ञानाची कल्पना येते. त्याने अनेक शिलेदार भारतीय क्रिकेटचे मटेरियल म्हणून दिले. संजू सॅमसन, इशान किशान, पृथ्वी शॉ, शूभमन गील व देवदत्त पडीक्कल आणि प्रियम गर्ग असे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएल स्पर्धेने भारतीय संघाचे भविष्यातील शिलेदार म्हणून नावारूपाला आले.

द्रविडने दिलेल्या शिलेदारांतील अनेकांना भारतीय संघात संधीही मिळाली होती. त्यावेळी त्यांना आपली कामगिरी सिद्ध करता आली नव्हती. मात्र, कोणत्याही खेळाडूचा दर्जा अशा बोटांवर मोजता येईल इतक्‍या सामन्यांतून स्पष्ट होत नाही तर, त्याला भरपूर संधी दावी लागते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पहिले एकदिवसीय शतक साकार करण्यासाठी सामन्यांची तिशी ओलांडली होती. त्यानंतर त्याच्या “पॅसेंजर’ची “शताब्दी एक्‍सप्रेस’ झाली. वयाच्या पन्नाशीच्या आधी त्याच्या शतकांची “शतकी संख्या’ उभी राहिली होती. या सहा शिलेदारांनाही जर तेवढीच संधी मिळाली, तर भारतीय क्रिकेटला येत्या काळातील सचिन, विराट कोहली किंवा चक्‍क द्रविडही गवसेल.

खरे सांगायचे तर, सचिनची गुणवत्ता कोहलीकडे नाही. तो सध्या त्याची भूमिका अदा करत आहे. मात्र, द्रविडसारख्या खेळाडूंना कित्येक दशके पर्याय मिळत नाही, कारण आधुनिक क्रिकेटमध्ये द्रविड इतका संयम असलेले खेळाडू आता तयार तरी होतात का, असा प्रश्‍न पडतो. म्हणूनच त्याचे हे सहा शिलेदार येत्या काळात भारतीय क्रिकेटच नव्हे, तर जागतिक क्रिकेट गाजवतील, असा विश्‍वास वाटतो.
बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालकपद द्रविडला दिले तेव्हाच या खाणीतून कोहिनूर गवसणार हा विश्‍वास होता व द्रविडनेही तो सार्थ ठरवला. सूत्रे योग्य हातात असतील तर कोणतेही गणित सहज सुटते असे म्हणतात. त्याच धर्तीवर द्रविडच्या प्रशिक्षणात या सहा खेळाडूंनी आपल्या गुणवत्तेने सचिनसह अनेक दिग्गज फलंदाजांना कौतुक करायला भाग पाडले, यातच द्रविडचे यश अधोरेखित होते.

एकेकाळी भारतीय संघात सुनील गावसकर यांच्या छायेत गुंडाप्पा विश्‍वनाथ, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ हे दुर्लक्षित राहिले होते, असे म्हणतात. पण 1990 च्या दशकात सचिनच्या छायेत सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्यापेक्षा जास्त झाकोळला गेला तो द्रविड. मात्र, आता या छायेतून बाहेर येत त्याने आपल्या शिलेदारांना “स्काय इज द लिमिट’ दाखवले व ते देखील द्रविडने दाखवलेल्या वाटेवरूनच प्रवास करत आहेत.

यंदा अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेत हे सहाही शिलेदार मैदान गाजवताना दिसले, यातच द्रविडच्या कर्तृत्वाची कल्पना येते. या सहा खेळाडूंपैकी सॅमसन व इशान भारतीय संघातून तसेच भारताच्या “अ संघा’कडूनही खेळले आहेत. पृथ्वी शॉ, शुभमन गील 19 वर्षांखालील संघाकडून खेळले आहेत. या दोन्ही संघांसाठी द्रविडनेच प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. भारतीय संघात निवड होण्यापूर्वी सॅमसन भारताच्या “अ संघा’कडून द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली खेळला होता. तेव्हाच द्रविडने त्याचा उल्लेख “लंबी रेस का घोडा’, असा केला होता. रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाकडून खेळताना देवदत्त पडीक्कल “इंडिया मटेरियल’ म्हणून नावारूपाला आला आहे. त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. खुद्द कोहलीनेच त्याला प्रमाणपत्र दिले, यातच द्रविडच्या महानतेची साक्ष पटते. 

पडीक्कल हा देखील द्रविडचाच शिलेदार आहे. तो 19 वर्षांखालील भारतीय संघात होता. त्याला जेव्हा बेंगळुरू संघाने आपल्याकडे घेतले तेव्हा खूप टीका झाली होती. मात्र, त्याने आपली गुणवत्ता सिद्ध करताना टीकाकारांची तोंडे आपल्या कामगिरीने बंद केली. कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत असलेला उभरता स्टार फलंदाज शुभमन गिल देखील द्रविडच्या तालमीत तयार झाला आहे. त्याने यंदाच्या स्पर्धेत आपल्या फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण संघाचा भार वाहिला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ हा देखील द्रविडचीच फाइंड आहे. त्याच्याकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खरा वासरदार म्हणून पाहिले जात आहे. भारतीय संघाचे भविष्य म्हणून पाहिले जात असलेल्या पृथ्वीने मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे. एकदा स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्रशिक्षकांना माहिती न देता औषध घेतल्याने त्याला बंदीला सामोरे जावे लागले होते. जागतिक व राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी समितीने बंदी घातलेल्या औषधांच्या यादीत ते औषध असल्याने पृथ्वीवर ही कारवाई करण्यात आली होती. त्याही वेळी तो अकादमीत जाऊन द्रविडला भेटला होता.

आज मात्र, त्याला त्याच्या कारकिर्दीबाबत गांभीर्य असल्याचे सिद्ध होत असून आयपीएल स्पर्धेत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत असलेला इशान किशान सध्या जास्त चर्चेत आहे. त्याने बेंगळुरू संघाविरुद्धच्या सामन्यात 99 धावांची वादळी खेळी केली होती. तो देखील द्रविडचाच शिलेदार.

भारतीय क्रिकेट संघासाठी “सेकंड बेंच’ सातत्याने तयार होत आहे. यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे योगदान मोलाचे आहे. यातूनच शिवम मावी व कमलेश नागरकोटी हे भारताच्या वेगवान गोलंदाजीचे खंदे वारसदार म्हणून पुढे येण्याच्या क्षमतेचे आहेत. आज महंमद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा व भुवनेश्‍वर कुमार यांच्या निवृत्तीनंतर हेच दोन गोलंदाज भारताचे वेगवान गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र बनतील यात शंका नाही. 

महान गोलंदाज कपिल देव निवृत्त झाले, तेव्हा आता भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचा भार कोण वाहणार, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यावेळी जवागल श्रीनाथ हा त्यांचा काही प्रमाणात का होईना वारसदार ठरला. वेंकटेश प्रसाद, लक्ष्मीपती बालाजी वगैरे संघात आले तेव्हा पाकिस्तानचा माजी कर्णधार व “सुलतान ऑफ स्विंग’ म्हणून ओळखला जात असलेला वसीम अक्रम याने “बीसीसीआयची निवड समिती दक्षिण भारतातून वेगवान गोलंदाज कसे निवडते?’ असा सवाल केला होता.

क्रिकेट ज्यांना समजते ते अक्रमच्या वक्‍तव्यावर आक्षेप घेणार नाहीत. उत्तरेतून आलेले पाकिस्तानी गोलंदाज पाहिले तर हे लक्षात येते की, आशियाई देशांत उत्तरेतून आलेले गोलंदाज सर्वात भेदक अस्त्र ठरले आहेत. खुद्द अक्रम, वकार युनुस, शोएब अख्तर हे पाकिस्तान संघात उत्तरेतूनच आले. आपल्याकडे आता उत्तरेतून आलेला महंमद शमी आहे आणि आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत राजस्थान व उत्तर प्रदेशातून अनेक युवा गोलंदाज येत आहेत. प्रत्येकाकडे गुणवत्ता आहे का नाही, ते येणारा काळच ठरवेल. मात्र, सध्याच्या आयपीएलमधील विविध गोलंदाज पाहिले तर असे लक्षात येते की शिवम मावी व कमलेश नागरकोटी यांच्याकडे आता “इंडिया मटेरियल’ म्हणून पाहिले जात आहे.

वर्ष 2018 मध्ये झालेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेचे मावी हे फाइंड आहे. वेगवान गोलंदाज असला तरीही त्याच्याकडे फलंदाजीचीही क्षमता आहे व त्याने विश्‍वकरंडकातही ते सिद्ध केले. मैदानावरचा त्याचा वावरच जाणकारांच्या आश्‍चर्याचा विषय बनला आहे. एखाद्या नवख्या खेळाडूप्रमाणे दबून राहणे त्याच्यात कधीच दिसले नाही. त्याला दोन वर्षांपूर्वीच कोलकाता नाइट रायडर्सने तब्बल 3 कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले यातच त्याची गुणवत्ता अफाट आहे हे वेगळे सांगायला नको. यंदाच्या स्पर्धेतही त्याने आपली कामगिरी राजस्थानविरुद्धच्या सामन्यातून सिद्ध केली.

आता या स्पर्धेत तो सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात यशस्वी ठरला तर आगामी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड करताना त्याच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्‍यताही व्यक्‍त केली जात आहे. कमलेश नागरकोटी याच्यात झहीर खानचीच गुणवत्ता झळकते. राजस्थानमध्ये जन्मलेल्या कमलेशने 2016-17 सालच्या विजय हजारे करंडक स्पर्धेतून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. शिवम मावी प्रमाणेच हा युवा गोलंदाजही वयाच्या विशीत आहे. त्यामुळे खूप मोठी कारकीर्द त्याला खुणावत आहे. गुजरातविरुद्धच्या याच स्पर्धेतील सामन्यात त्याने हॅट्ट्रिक घेत देशांतर्गत क्रिकेटच्या वर्तुळात एन्ट्री केली. त्याच्याकडे वेग आहे, बाउंन्स आहे तसेच भन्नाट यॉर्करही आहे. 

भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहप्रमाणे कमलेशही यॉर्कर टाकण्यात माहीर आहे. एखाद्या परदेशी गोलंदाजाप्रमाणे सातत्याने ताशी 149 किलोमीटर इतक्‍या प्रचंड वेगाने गोलंदाजी करण्याची त्याची क्षमता अनेकांच्या भुवया उंचावत आहे. कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात मावीसह कमलेशही असल्याने त्यांच्या कामगिरीवर आता निवड समितीची नजर आहे. आगामी मालिकांसाठी या दोन्ही खेळाडूंना संधी देण्याचा विचार झाला, तर कदाचित देशाला झहीर खान व बुमराह यांचे वारसदार निश्‍चितच मिळालेले असतील.

गर्गकडून मोठ्या अपेक्षा सनरायझर्स हैदराबादचा नवोदित खेळाडू प्रियम गर्गही द्रविडचाच शिलेदार. परिस्थितीशी झगडा करून नावारूपाला आलेला हा खेळाडू आज आयपीएलचे व्यासपीठ गाजवत आहे.
त्याचे वडील नरेश गर्ग स्कूल व्हॅन चालक आहेत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच, पण मुलाच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी वडिलांनीच पुढाकार घेतला. हे उदाहरण क्रीडा क्षेत्रात अनेक पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी पुरेसे आहे. जर घरातूनच पाठिंबा मिळाला तर कोणत्याही खेळाडूला इतर कोणाकडे हात पसरण्याची वेळ येणार नाही व ड्रॉप आउटचे प्रमाण वाढणार नाही. प्रियमचे कुटुंब मोठे आहे. त्याच्यासह एकूण पाच भाऊ व बहिणी आहेत.

उत्तर प्रदेशमधील मेरठजवळच्या परिक्षितगडचा रहिवाशी असलेला प्रियम शालेय शिक्षणाबरोबरच रोज सहा तास क्रिकेटच्या शिबिरात सराव करत असे. तो केवळ 11 वर्षांचा असताना त्याचे मातृछत्र हरपले. त्यानंतर नरेश यांनीच आई व वडील या दोन्ही भूमिका यथोचित सांभाळल्या. वर्ष 2011 मध्ये त्याच्या आईचे निधन झाले. मात्र, प्रियमने सचिन तेंडुलकरसारखे क्रिकेटपटू व्हावे हे या माउलीचेच स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास त्याने घेतला व आज ते स्वप्न पूर्ण झाले. आयपीएल का होईना, पण जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठ्या व्यासपीठावर आज प्रियम खेळत आहे. त्याचा समावेश स्थानिक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण झाल्यामुळे उत्तर प्रदेशच्या रणजी संघात समावेश झाला व तेथूनच त्याच्या सर्वसामान्य खेळाडू ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असा प्रवास सुरू झाला. या स्पर्धेतही त्याने चमक दाखवली व त्याच्यासाठी 19 वर्षांखालील भारताच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या संघाचे कवाड खुले झाले. त्याला केवळ संघात स्थान मिळाले नाही तर त्या स्पर्धेसाठी त्याच्याकडेच नेतृत्वही सोपविण्यात आले होते. वयाच्या सहाव्या वर्षी क्रिकेटची गोडी लागलेल्या प्रियमला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे अवकाश खुणावत आहे. त्याने स्थानिक क्रिकेटमध्येही आपला ठसा उमटवला.

प्रियमला जेव्हा विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी कर्णधार बनवले गेले तेव्हा अनेक जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, या खेळाडूकडे अफाट गुणवत्ता आहे, हे आयपीएलमध्ये सिद्ध झाले. त्याने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 26 चेंडूत केलेली 51 धावांची अर्धशतकी खेळी त्याच्या गुणवत्तेचीच साक्ष देते. या सामन्यानंतर खुद्द धोनीनेही त्याचे कौतुक केले यातच सर्व काही आले. त्याला आता अन्य कोणत्याही प्रशस्तीपत्रकाही गरज नाही. सचिन तेंडुलकरचा खेळ पाहातच लहानाचा मोठा झालेला प्रियम सचिनच्याच पावलावर पाऊल ठेवत जागतिक क्रिकेट गाजवायला सज्ज बनला आहे.

देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत सर्वात महत्त्वाच्या समजल्या जात असलेल्या रणजी स्पर्धेत उत्तर प्रदेशकडून खेळताना त्याने 2018-19 या मोसमात 800 पेक्षाही जास्त धावा केल्या. त्याने गोवा संघाविरुद्ध पहिलाच रणजी सामना खेळताना शानदार शतकी खेळी केली. याच स्पर्धेत त्रिपुरा संघाविरुद्धच्या सामन्यात त्याने द्विशतकी खेळी केली. या संपूर्ण मोसमात प्रियमने जवळपास 68 च्या सरासरीने या धावा करताना दोन शतके व चार अर्धशतके फटकावली. त्याचा खेळ बहरत आसतानाच त्याला अनेक स्पर्धांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

गेल्या वर्षी झालेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत प्रियमच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. गेल्या वर्षी त्याने सय्यद मुश्‍ताक अली स्पर्धेतही पदार्पण केले. त्यातील कामगिरीवरूनच त्याला देवधर, विजय हजारे या मानाच्या स्पर्धेतही खेळायला मिळाले व त्याला स्थानिक स्पर्धांचा मोठा अनुभवही मिळाला. आज तो वयाच्या विशीत आहे, समोर मोठी कारकीर्द आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली त्याला एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूकडून जे मार्गदर्शन मिळत आहे ते त्याच्या संपूर्ण वाटचालीसाठी प्रचंड लाभदायक ठरणार आहे. त्याला रणजी स्पर्धेतील तसेच अन्य देशांतर्गत स्पर्धेतील कामगिरीनंतर हैदराबाद संघाने जवळपास दोन कोटी रुपयांना आपल्या संघात घेतले यातच त्याची गुणवत्ताही सिद्ध होते. वॉर्नरसह राहुल द्रविडचेही मार्गदर्शन लाभल्याने त्याला परिसस्पर्श झाला असून येत्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हा हिरा आपली चमक सिद्ध करेल यात शंका नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर गॅरी सोबर्स किंवा विक्रमादित्य सुनील गावसकर जे बोलतात, ते प्रत्येक वाक्‍य प्रमाण मानले जाते. द्रविडचे नाव जेव्हा भारतीय क्रिकेटचा सर्वात संयमी फलंदाज म्हणून गाजू लागले तेव्हा गावसकरांनी एक वक्‍तव्य केले होते. “जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर त्यासाठी संघात सचिन हवा. मात्र, जर तुम्हाला सामना वाचवायचा असेल तर संघात द्रविडच हवा.’ मला वाटते यापेक्षा मोठी स्तुती कोणतीच नसेल. आज द्रविड निवृत्त झाल्यावरही भारतीय संघाच्याच फायद्याचे कार्य करीत आहे. त्याच्याकडे येणारा प्रत्येक खेळाडू मोठी स्वप्ने घेऊन बाहेर पडतो हे देखील सिद्ध होत आहे. द्रविडला त्याच्या शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून अनोखी गुरूदक्षिणा दिली आहेच आता हे खेळाडू जेव्हा जागतिक क्रिकेट गाजवतील त्यावेळी सर्वात जास्त आनंद व समाधान या खेळाडूंच्या बरोबरीने द्रविडलाही होणार आहे. द्रविडने भारतीय क्रिकेटचे भविष्य घडवले आहे हे मात्र निश्‍चित.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.