खंडेरायाचे दर्शन घेत मराठी वराकडून वधूसह धार्मिक विधी
जेजुरी (वार्ताहर) –अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून जेजुरीचा खंडेराया बहुजन बांधवांमध्ये प्रचलित असला तरी आजच्या विज्ञान युगात भारतीय संस्कृतीमधील जागत्या गाजत्या लोकदेवाची महती अवघ्या विश्वात नांदत असल्याचे जाणवते. फिनलॅंड (रशिया आणि स्वीडनच्या मध्ये असलेला छोटासा देश) येथील भाविकांनी आपल्या भारतीय म्हणजेच मराठी जावईबापुंसह बुधवारी (दि.11) जेजुरीत येत कुलधर्म -कुलाचार, जागरण गोंधळ, तळीभंडार आदी विधी करीत श्रद्धेने गडावर जात खंडेरायाचे दर्शन घेत जयघोष केला.
कल्याण-सुभेदार वाडा (जि. ठाणे) येथील निवृत्त प्राचार्या समिधा इनामदार यांचा मुलगा डॉ. ओंकार इनामदार हे फिनलॅंड मध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात ते मूळचे औंध संस्थानमधील एका खेडेगावातील, मात्र उद्योग व्यवसायानिमित्त ठाणे येथे स्थायिक झाले. पुढे त्यांच्या मुलाने रशियामध्ये वैद्यकीय घेतले तर आफ्रिकेमध्ये कॅन्सर आजारावर रिसर्च केले, त्यानंतर एम.डी. फिजिशियन ही पदवी फिनलॅंड येथे प्राप्त करून तेथेच प्रॅक्टिसला सुरुवात केली. याच ठिकाणी परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या येन्ना हलकोला यांच्या बरोबर विवाह ठरला. (विवाहानंतर त्यांचे नाव जेन्नोम ठेवले आहे) आणि रविवारी (दि.8) ठाणे येथे मराठी संस्कृतीप्रमाणे विवाह पार पडला.
इनामदार घराण्याचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया असल्याने वधूकडील माता पिता, बहिणी, मेहुणे, भाऊ, भावजयी, मित्र-मैत्रिणींसह 23 जणांचा वरपक्ष जेजुरीत बुधवारी दाखल झाला. रिवाजा प्रमाणे वधूला पाच पायऱ्या उचलून घेत वर-वधुसह सर्वांनी मंदिरात देवदर्शन घेतले. शहरातील पुरोहित खाडे यांच्या निवासस्थानी जागरण-गोंधळ करीत तळीभंडार करून लंगर तोडण्यात आला. या सर्व विधींमध्ये परदेशी पाहुणे मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते. यावेळी देवसंस्थानचे विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील यांनी भाविकांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. तर, दरवर्षी आम्ही येथे येऊन धार्मिक विधी करणार असल्याचे परदेशी पाहुण्यांनी सांगितले.