पाहणी दौरा अर्धवट सोडून केंद्रीय पथक परतले

संगमनेर तालुक्‍यात रस्त्यालगतच्याच नुकसानग्रस्त द्राक्षबागा पाहणीसाठी निवडल्या
संगमनेर  (प्रतिनिधी) –अवकाळीने हाहाकार उडविला असताना तब्बल पंचवीस दिवसांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यासाठी निवडलेल्या नुकसानग्रस्त बागा रस्त्यांच्या लगतच्याच असल्याने नुकसानीपासून पथकाला दूरच ठेवण्यात आल्याचे दिसले. त्यातही नियोजित दौरा अर्धवट सोडून पथक माघारी परतल्याने जवळे कडलग येथील शेतकऱ्यांनी दोन तासांची प्रतीक्षा व्यर्थ गेल्याने संताप व्यक्त केला. आधी पावसाने धोका दिला आणि आता मदतीसाठी आलेल्या पथकाने पळ काढल्याने नाराजी व्यक्त केली.

संगमनेर तालुक्‍यात 37 हजार 118 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला. शासनाने नुकसानीचे पंचनामे केले खरे. पण मिळणारी मदत तोकडी असल्यामुळे शेतकरी संकटात सापडले. नियोजित दौऱ्यानुसार आज सकाळी संगमनेर तालुक्‍यातील सादतपूरपासून दौऱ्यास सुरुवात केली. पथक 11.30 वाजेच्या दरम्यान सादतपूर पोहोचले. येथे लक्ष्मण बोरसे यांच्या शेतात नुकसान झालेल्या बाजरी, सोयाबीन, मका पिकाची पाहणी केली. तेथून जवळे कडलग येथील चार शेकाऱ्यांच्या शेतात नुकसानीची पाहणी करण्यास जाणार होते. त्यानुसार शेतकऱ्यांना कल्पनाही देण्यात आली होती. ते सकाळी अकरा वाजल्यापासूनच त्यांची वाट पहात होते.

जवळे कडलग, वडगाव लांडगा, चिकणी येथील हजारो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला असताना पथकाने पृथ्वीराज सुर्वे यांच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या एका प्लॉटची पाहणी केली. दहा मिनिटांत दौरा संपला. काही शेतकऱ्यांशी जुजबी चर्चा केली. 170 गावे अवकाळीने बाधित असून, साठ हजार 477 शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला असताना पथकाने तालुक्‍यातील दोन प्लॉटची पाहणी केली. आणि काही वेळात दौरा संपला. त्यामुळे 170 गावांतील नुकसानीचा अंदाज दोन शेत प्लॉटवर ठरणार आहे का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण तालुका अवकाळी बाधित झाला असल्याने समाधानकारक पाहणीची अपेक्षा होती. मात्र पथकाचा दौराच रस्त्यालगत नियोजित करण्यात आला होता. रस्त्यालगतच्या शेतात डाळिंब, बाजरी, मका, सोयाबीन, कांदा पथकाला दिसला नसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

पाहणी पथकाच्या समितीमध्ये केंद्रीय पथकातील वित्त विभागाचे सल्लागार दिनानाथ आणि शेतकरी कल्याण विभाग संचालक डॉ. सुभाष चंद्र यांच्यासमवेत नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप सहभागी झाले होते. तसेच संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरुळे, संगमनेर उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते. जवळे कडलग येथे दाखल झालेल्या पथकाने द्राक्षबागांच्या नुकसानीची पाहाणी केली.

शेतकऱ्यांशी संवाद साधला असता शेतकरी म्हणाले 31 ऑक्‍टोबरला शासनाने आदेश काढून चालू हंगामासाठी विमा योजना लागू केली आहे. त्यानुसार 8 नोव्हेंबरपासून द्राक्षबागांना विमा संरक्षण लागू होणार आहे. त्यापूर्वी आठवडाभर अगोदर आमचे नुकसान झाल्याने कोट्यवधीचे द्राक्षबागांचे नुकसान होऊन देखील, या अटींमुळे आम्हा द्राक्षबागायतदारांना कोणताच फायदा होणार नाही. शासनाने आदेशाची तारीख बदलावी, असे म्हटल्यानंतर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याचे नाव नोंदवून घेतले.

सरसकट कर्ज माफ करा
साहेब, नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. गत दोन वर्षांत दुष्काळामुळे टॅंकरच्या पाण्यावर पिके जगविली. बॅंकेचे कर्ज काढून पिके वाचविली. चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना अवकाळी पावसाने सारं होत्याचं नव्हतं केलं. साहेब सरसकट कर्ज माफी करा अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, अशा शब्दात शेतकऱ्यांनी भावान व्यक्त केल्या.

दौरा फार्स ठरू नये
प्रशासनाने गावे निवडताना पठार भागात कांदा नुकसानीची पाहणी करण्यासाठी नेण्याची आवश्‍यकता होती. द्राक्ष बागांसह सोयाबीन, मक्‍याचे नुकसान दाखविण्यात आले. मात्र, नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून तर झाला नाही ना? असा सवाल उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.