पुणे – परदेशी भाषा शिकण्यासाठी पुणे हे महाराष्ट्रातले एक नावाजलेले शहर असून पुण्यात जर्मन भाषेच्या शिक्षणाला किमान 50 वर्षांहून अधिक कालखंड निघून गेला आहे. पुण्यात गेली आठ वर्षे डॉइश फोरम ही संस्था जर्मन भाषेमधल्या एकांकिकांची स्पर्धा घेत असते. येथे विविध एकांकिका जर्मन भाषेचे अभ्यासक सादर करत असतात.
स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात सर्वप्रथम संतनीनियमन, लैंगिक शिक्षण आणि कुटुंब नियोजनाविषयी जनजागृती करणारे “समाजस्वास्थ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्या कार्यावर आधारित “द व्हिजनरी’ या शिर्षकाची एक एकांकिका आज दि. 14 मार्च रोजी येथील ज्योत्स्ना भोळे नाट्यगृहात सादर करण्यात आली. या एकांकिकेस रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
या एकांकिकेचे लेखन उद्धव गोडबोले यांनी आणि दिग्दर्शन प्रसन्न हरणखेडकर यांनी केले असून सोनल पटवर्धन निर्मात्या आहेत. र. धों. कर्वे यांनी केलेल्या कार्यावर फ्लॅशबॅक तंत्राचा आधार घेत प्रकाश टाकण्यात आला.
कर्वेंची धर्ममार्तंडांशी झालेली वादसभा असेल, न्यायालयातील खटला असेल किंवा त्यांच्या संततीनियमन केंद्राद्वारे वाटली गेलेली पत्रके असोत, अशा विविध घटनांचे चित्रण या एकांकिकेत परिणामकारकरित्या करण्यात आले.