वांबोरीत घडले खाकीतल्या माणुसकीचे दर्शन

अत्यवस्थ गर्भवती महिलेला केली मदत : नागरिकांकडून कौतुक 
राहुरी – वांबोरीतील अत्यवस्थ गर्भवती महिलेला मध्यरात्री गस्त घालणारे पोलीस अधिकारी सुशांत दिवटे व होमगार्ड काकडे यांनी प्रसंगावधान दाखवत वेळीच तत्काळ मदत केली. रस्त्यावर प्रसूत झालेल्या महिलेला तातडीचे रुग्णालयातील उपचार मिळाले. प्रसूतीनंतर दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ नवजात अर्भकाची हालचाल नसतानाही वेळेवर मिळालेल्या उपचारांमुळे अर्भक सचेतन झाले.यामुळे खाकीतल्या माणुसकीचे दर्शन घडले.

वांबोरी परिसरातील पुलवाडी येथील महिला आपल्या माहेरी वांबोरी येथे प्रसूतीसाठी आलेली होती.शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास प्रसूती वेदना होवू लागल्या. तिचे वडील बापूसाहेब धुमाळ यांनी तिला एका वाहनातून वांबोरीतील खासगी दवाखान्यात आणले. बराच वेळ दवाखान्याचा दरवाजा ठोठावला.

डॉक्‍टरांचा प्रतिसाद मिळाला नाही. अचानक ती महिला दवाखान्याच्या दारातच प्रसूत झाली. यावेळी गावात गस्तीवर असलेले सुशांत दिवटे यांना महिलेच्या वेदनेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. ते आवाजाचे दिशेने गेले असता चित्र स्पष्ट झाले. रात्रीच्या वेळी बाळ व मातेला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाण्याचे अगोदर सुशांत दिवटे यांनी गावातील तीन चार दवाखान्यांना संपर्क केला. परंतु प्रसूतीची सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र वांबोरी ग्रामीण रुग्णालयात फक्त परिचारिका उपलब्ध असल्याचे त्यांना समजले.

क्षणाचाही विलंब न करता वांबोरी ग्रामीण रूग्णालयात बाळ, आईसह येण्याअगोदर ग्रामीण रुग्णालयात दुचाकीवरून जाऊन सुशांत दिवटे यांनी दवाखान्याचा दरवाजा उघडून उपचाराची संपूर्ण पूर्वतयारी करण्यास सांगितले. रुग्णालयातील परिचारिका सुवर्णा पाठक, सुरेश बागडे व आशा मदतनीस सविता गडाख यांनी पाहिले असता नवजात अर्भक अचेतन असल्याचे जाणवले. तत्काळ त्यावर उपचार करून सुमारे दहा मिनिटांच्या कालावधीनंतर बाळाने मोठा हंबरडा फोडला व ते सचेतन झाले. एका कर्तव्यदक्ष अधिकारामुळे नवजात अर्भकाचे व एका मातेचे प्राण वाचले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)