पंतप्रधान मोदींकडून सतत आचरसंहितेचे उल्लंघन – माजी निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत आचरसंहितेचे उल्लंघन करत असून, निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी टीका माजी निवडणूक आयुक्त डॉ.एस.वाय. कुरैशी यांनी केली आहे. संबलपूरमध्ये मोदींच्या हेलिकॉप्टरची झडती घेतल्यामुळे निवडणूक आयोगाने ओडिशातील १९९६ मधील बॅचच्या आयएएस अधिकाऱ्याला (मोहम्मद मोहसिन) बुधवारी निलंबित केलं होत. यावरूनच डॉ.एस.वाय. कुरैशी यांनी निवडणूक आयोग आणि मोदींवर निशाणा साधला आहे.

या अधिकाऱ्याचे निलंबन हे केवळ दुर्भाग्य नाही, तर पंतप्रधान आणि निवडणूक आयोगाने आपली प्रतिमा सुधारण्याची मोठी संधी गमावली आहे, असे डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे सतत आचारसंहितेचे उल्लंघन करत असून सुद्धा, निवडणूक आयोग याकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसत असल्याचे ते म्हणाले. कायदा देशातील प्रत्येक नागरिकाला लागू होतो, मग ते पंतप्रधान असो किंवा सामान्य माणूस. जर हेलिकॉप्टरची तपासणी केल्याप्रकरणी कारवाई केली नसती तर, निवडणूक आयोग आणि पंतप्रधानमंत्री यांच्यावर होणारी टीका थांबली असती. मात्र, असे झाले नाही,त्यामुळे दोघांवरही टीका होत आहे, असे डॉ. एस.वाय.कुरैशी यांनी सांगितले.

दरम्यान,यावेळी डॉ. एस.वाय. कुरैशी यांनी ओडिशाचे मुखमंत्री नवीन पटनायक यांच्या हेलिकॉप्टर तपासणीचे सुद्धा उदाहरण दिले. “नवीन पटनायक यांच्या डोळ्यासमोर निवडणूक आयोगाच्या टीमने हेलिकॉप्टरची तपासणी केली. मात्र,
नवीन पटनायक यांनी याविरोधात कोणतीही प्रतिक्रिया देण्याऐवजी याचा सन्मान केला. ते खरे राजनेता आहेत आणि आम्हाला अशा राजनेत्यांची गरज आहे,” असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.