मायणी परिसरातील द्राक्षबागांचे पंचनामे पूर्ण

मायणी  – मायणी परिसरामधील सुमारे 187 हेक्‍टर क्षेत्रातील द्राक्षबागांच्या नुकसानीचे पंचनामे कृषी मंडळाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. पंचनाम्याच्या दरम्यान अनेकांनी बागा काढल्याचे तसेच अनेकांनी यावर्षी बागांचा द्राक्षांचा माल अतिपावसामुळे न धरल्याचे चित्र समोर आले आहे.

मायणीसह परिसरातील कलेढोण, म्हासुर्णे व पडळ भागातील द्राक्ष बागांचे अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरु झाले आहे. या परिसरामधील सुमारे 187 हेक्‍टर क्षेत्रातील द्राक्ष बागांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.

कलेढोण परिसरामधील दोन द्राक्ष बागायतदारांनी बागा काढून टाकल्या आहेत. तर अनेकांनी यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे तसेच अजूनही पाऊस सुरु असल्यामुळे बांगाची छाटणी केली पण पुढील खर्च व येणाऱ्या उत्पन्नाचा ताळमेळ लागणार नाही म्हणून बागा सोडून दिल्या आहेत, अशी पंचनाम्याच्या दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मायणी परिसरामध्ये सध्या मायणी कृषी मंडल अधिकारी दिलीप दाभाडे, कलेढोण कृषी सहाय्यक नवनाथ अवताडे, म्हासुर्णे कृषी सहाय्यक टी. यू. आदलिंगे, पडळ कृषी सहाय्यक सिकंदर जगताप व अनफळे कृषी सहाय्यक दीपक बेडके व कर्मचारी पंचनामे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.