तळिये ग्रामस्थांनी रोखले रस्त्याचे निकृष्ट काम

अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची पोलखोल 

वाठार स्टेशन  – मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तळिये (ता. कोरेगाव) येथे सुरु असलेल्या रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराकडून अत्यंत दर्जाहिन पद्धतीने सुरु असल्याची बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच संतप्त ग्रामस्थांनी हे काम रोखले आहे. दरम्यान, दर्जेदार काम करण्याबाबत वारंवार सूचना करुनही ठेकेदार आणि अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तळीये ते वाठार – विखळे रस्ता असे सुमारे दोन किलोमीटरचा रस्ता अतिशय खराब झाला होता. सुमारे 15 वर्षांपासून या रस्त्याने प्रवाशी मोठ्या कसरतीने वाहने चालवत होते, रस्त्यावरील खडी पूर्णपणे विस्कटली होती, एकंदरीत रस्त्याची चांगलीच दुर्दशा झाली होती. त्यामुळे नुकतेच सदरच्या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सुरू करण्यात आले होते. विशेष म्हणजे या मार्गावरील छोट्या पुलांचेही मुरुमीकरण, खडीकरणाचे काम सुरू आहे. तीन पुलांचे काम पूर्ण झाले असून तळीये गावाशेजारी चौथ्या पुलाचे काम सध्या सुरू होते.

या पुलाच्या कामासाठी निकृष्ट पद्धतीच्या ग्रीडचा वापर करण्यात आला आहे. तसेच सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने कामाची गुणवत्ता खराब असल्याचे दिसून येत असून मुरुमीकरण करत असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीमिश्रीत मुरमाचा वापर या ठिकाणी होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. ही बाब सतर्क ग्रामस्थांनी ठेकेदार तसेच अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिली. तरीसुद्धा सदर काम अधिकारी व ठेकेदार या दोघांच्या संगनमताने रस्त्याचे काम रेटून नेत असल्याने संतप्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम बंद पाडले. यावेळी तळीये येथील आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×