पुणे : उरूळी देवाची गावामध्ये महापालिकेकडून टॅंकर द्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, पाण्याचा टॅक़र आल्यानंतर पाणी भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत असल्याने करोनाची साथ थैमान घालत असतानाच या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडाला होता. त्यामुळे या भागात करोनाचा प्रसार होण्याची भिती निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने टॅंकर द्वारे पाणी देण्यात येणाऱ्या भागात एक हजार लीटरच्या क्षमतेच्या 20 टाक्या तातडीनं बसविल्या आहेत. तसेच या टाक्यांचे नळही विरूध्द दिशांना बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आता पाणी भरताना नागरिकांना सहज सोशल डिस्टंन्स पाळणे शक्य होणार आहे.
अडीच वर्षांपूर्वी हे गाव महापालिकेत समाविष्ट झाले आहे. मात्र, पालिकेच्या कचराडेपो मुळे उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील जलस्त्रोत प्रदूषित झाल्याने पालिकेकडून या गावांना गेल्या अनेक वर्षापासून टॅंकर द्वारे पाणी दिले जात आहे. मात्र, यावेळी करोनामुळे स्थिती गंभीर असल्याने आधीच लोकांमधे भिती आहे, तसेच गर्दीही टाळायची आहे. मात्र, पाण्याचा टॅंकर येताच, पाण्यासाठी झुंबड उडत असून सोशल डिस्टंन्सिंग पाळले जात नाही.
ही बाब लक्षात घेऊन पालिकेनेच यावर उपाय शोधला पाण्यासाठी होणारी गर्दी पांगवणे गरजेचे असल्याने महानगरपालिकेकडून गावा मध्ये काही जागा निश्चित करून तेथे तातडीने चौथरे बांधून त्यावर सिंटेक्स टाक्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत. सलग असलेल्या टाक्यांना विरुद्ध दिशेला नळ बसविण्यात आलेले आहेत. प्रत्येकी 1 हजार लीटर क्षमतेच्या या टाक्या असून या टाक्या टॅंकरच्या पाण्याने भरल्या जाणार आहेत. त्यानंतर नागारिकांना सुरक्षित अंतर ठेऊन टाक्यांमधून पाणी घेत येणार आहे. त्या मुळे प्रत्येकाला पाणी मिळणार असून या नागरिकांना पाण्यासाठी गर्दी करण्याची गरज भासणार नाही. या गावातील पाण्याबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे याबाबत लक्ष वेधले होते.
या भागात पालिकेचा टॅंकर जातो. मात्र, पाणी मिळेल का नाही या भितीने नागरिक गर्दी करत होतो, करोनासारख्या गंभीर आजाराचा प्रसार वेगाने होत असताना हा प्रकार थांबणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन तातडीनं चबुतरे बांधून टाक्या उभारल्या आहेत. आता नागरिकांची जबाबदारी असून त्यांनीच सामाजिक अंतर पाळून पाणी भरणे आवश्यक आहे. त्यासाठी टाक़्यांच्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आले आहेत.
– अनिरूध्द पावसकर (पाणी पुरवठा विभाग प्रमुख)