गाव एक अन्‌ तालुके दोन

प्रतिनिधिक छायाचित्र

उमेश सुतार
कराड – कराड व पाटण तालुक्‍यात समावेश असणाऱ्या जंगलवाडी या गावातूनच दोन तालुक्‍याची सीमारेषा जात असल्याने या गावाचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे या गावात सुविधा उपलब्ध करण्याकडेही लोकप्रतिनिर्धीकडून कानाडोळा केला जात आहे.

पाटण तालुक्‍यातील चाफळपासून उत्तरेच्या डोंगर माथ्यावर वसलेल्या जंगलवाडी या गावातून कराड व पाटण तालुक्‍याची हद्द जाते. त्यामुळे या गावातील निम्मी घरे पाटण तर निम्मी घरे कराड तालुक्‍यात मोडतात. त्यातच या गावात माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व ना शंभूराज देसाई असे दोन गट कार्यरत आहेत. याठिकाणी केवळ गटबाजीमुळे अनेक वर्षांपासून या गावाचा रस्त्याचा प्रश्‍न रखडत पडलेला आहे. तर कराड तालुक्‍याच्या हद्दीत असलेल्या गावातील कार्यकर्ते ना. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहेत. या गावाला रस्ता नसल्याने बारमाही पायवेटेनेच गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे.

गावात साधारणपणे शंभरच्या आसपास घरे आहेत. मात्र, यातील काही घरे कराड तालुक्‍यात तर काही पाटण तालुक्‍यात आहेत. गावचा काही भाग कराड तालुक्‍यातील कोरिवळे गावच्या हद्दीत तर काही भाग पाटण तालुक्‍यातील जाधववाडी गावच्या हद्दीत येतो. त्यामुळे जंगलवाडीची अवस्था एक गाव दोन तुकडे अशीच झाली आहे. एकाच ठिकाणी वसलेले हे चारशे लोकवस्तीचे गाव दोन तालुक्‍यामुळे आधे इधर, आधे उधर याप्रमाणे वसलेले आहे. या प्रकारामुळे या गावाला रस्त्यांसह इतर सुविधांचे ग्रहणच लागले आहे, असे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

महसुली दृष्ट्या या गावाला एकाच तालुक्‍यात घ्यावे, ही गावकऱ्यांची जुनी मागणी अजूनही शासनदरबारी प्रलंबितच आहे. कराड उत्तर आणि पाटण तालुका या दोन्ही मतदारसंघात या एका गावची विभागणी झाली आहे. गाव एकच पण तालुके दोन असल्याने त्याच्या महसुली नोंदी दोन वेगवेगळ्या ठिकाणी विभागण्यात आल्यामुळे गावकऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. परिणामी गावकऱ्यांना कोणत्याही शासकीय कामासाठी शासन दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत.

चाफळमार्गे जंगलवाडी हा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. शासनकर्ते या अर्धवट अवस्थेत डोंगराच्या कड्याखाली अडकलेल्या रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करु शकत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. शासनाचे उदासीन धोरण या सर्व परिस्थितीला जबाबदार आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया आजही स्थानिकांमधून व्यक्त होत आहेत.

आमच्या गावच्या रस्त्याचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. आमचे नेते आ. शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळे त्यांनी पाटण तालुक्‍यात मोडणाऱ्या चाफळवरुन येणाऱ्या रस्त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद केली आहे. तर कराड तालुक्‍यात मोडणाऱ्या साखरवाडीवरुन जंगलवाडीकडे येणाऱ्या रस्त्यासाठी आ. बाळासाहेब पाटील यांच्या माध्यमातून निधीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आज दोन्ही तालुक्‍याचे आमदार हे नामदार झाले आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्रीमहोदयांनी मनात घेतले तर आमचा पिढ्यान पिढ्याचा सुरु असलेला रस्त्याचा वनवास कायमस्वरुपी संपून जाईल.

हरी वीर, माजी उपसरपंच

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here