नाणे मावळ – नाणे ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीची माहिती घेण्यासाठी मावळ पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा कुंभार यांनी नाणे गावाला भेट दिली. या वेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या दृष्टीने लावलेले “ट्री-गार्ड’ पाहिले.
ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टिने मावळात प्रथमच “आरओ फिल्टर’चे पाणी ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिले आहे. अवघ्या पाच रुपयात पंचवीस लीटर पाणी पंचक्रोशीतील नागरिकांना मिळत आहे. त्यामुळे दूषित पाणी पिण्याची नामुष्की टळली आहे.
नाणे मावळातील “आरओ फिल्टर’द्वारे गावाला पाणीपुरवठा योजना सुरू करणारी नाणे ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. या भेटी दरम्यान सभापती कुंभार यांनी गावामध्ये वृक्षलागवड केली. या वेळी नाणे ग्रामपंचायतीचे सरपंच मारुती शेटे, उपसरपंच वैशाली कटके, ग्रामसेविका विद्या लोखंडे, कांबरे गावचे सरपंच भाऊसाहेब दाभणे, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक-शिक्षिका आदी उपस्थित होते.