पुणे – बंगालच्या उपसागरातील दक्षिण भागात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने येत्या चोवीस तासांत नैर्ऋत्य मान्सून अंदमान-निकोबारच्या बेटांवर दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार असल्याने या परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
वादळी प्रणालीमुळे बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यत मान्सून दाखल होण्याची शक्यता होती, पण तो दाखल झाला नाही. रविवार सकाळपासून मात्र हवामानात बदल होऊन अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर पावसाला सुरवात झाली. त्यामुळे आता मान्सून कुठल्याही क्षणी दाखल होईल. दरम्यान शनिवारी बंगालच्या उपसागरात ओडिशाच्या किनारपट्टीपासून 1060 किलोमीटर दक्षिणेकडे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून 1220 किलोमीटर दक्षिणेकडे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रीय होते. ताशी 180 ते 190 किलोमीटर वेगाने वारे वाहणारे हे चक्रीवादळ 18 ते 19 मे पर्यंत पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकण्याचे संकेत आहेत.
बंगालच्या उपसागरात ढगांची दाटी झाली असून, या भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. नवीन दीर्घकालीन सर्वसामान्य वेळेनुसार मान्सून 22 मेपर्यंत अंदमान-निकोबार बेटांवर दाखल होऊन बहुतांशी भाग व्यापण्याची शक्यता आहे. यंदा सर्वसाधारण वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. गतवर्षी 18 मे रोजी मान्सून दक्षिण अंदमानात दाखल झाला होता.