करोनाचे बळी देशांत 8 हजारांवर रोखता येतील

नवी दिल्ली – सामाजिक अंतर राखण्याच्या नियमांचे काटेकोर पालन आणि सतर्क रुग्णालये यांच्या जोरावर भारतातील करोना मृत्यूंची संख्या 8 हजारापेक्षा कमी ठेवता येईल, त्याच बरोबर केरळ, पंजाब आणि हरियाणा या राज्यांनी करोनाची परमोच्च अवस्था ओलांडली आहे. भारत एक होऊन करोनाशी लढत आहे असे चित्र दिसले नाही. कारण, राज्यातील लोकसंख्येचा आकार, आरोग्य यंत्रणा आणि साक्षरतेचे प्रमाण यांच्यात राज्यनिहाय आणि जिल्हानिहाय फरक आहे, असे इंडियन इट्यिट्यूटचे संचालक प्रा. जी व्ही. एस मूर्ती यांनी सांगितले.

करोनाच्या परमोच्च अवस्थेचा राज्य आणि जिल्हा पातळीवर विचार करावा लागणार आहे. देशाचा विचार केला तर 25 एप्रिलला दर 10 लाखांमागे 17.6 जण बाधित होते. तेच प्रमाण 25 मे रोजी ते 99.9 झाले. महाराष्ट्रात 25 एप्रिलला प्रती दहा लाख 61.9 तर 25 मे रोजी 383 बाधित झाले. तामिळनाडूत याच दिवशी अनुक्रमे 23.4 आणि 199.3 तर गुजरातमध्ये 48.1 आणि 219 असे प्रमाण होते. दिल्लीत मात्र ही वाढ तीव्र होती. 25 एप्रिलला दहा लाख लोकांमागे 140 बाधित असणाऱ्यांची संख्या 25 मे रोजी 690वर पोहोचली.

महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्ली ही राज्ये परमोच्च अवस्थेच्या जवळ असावीत, तर केरळ, पंजाब आणि हरियाणा यांनी ही अवस्था ओलांडली असावी, अशी शक्‍यात मूर्ती यांनी वर्तवली. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 70 टक्के बाधित आहेत. जो पर्यंत या राज्यात परमोच्च अवस्था येत नाही तो पर्यंत अन्य राज्यात ही परमोच्च अवस्था येणे अशक्‍य आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्याची स्थिती पाहता करोनाची परमोच्च अवस्था लवकरात लवकर जूनच्या सुरवातीला ते जुलैच्या मध्यापर्यंत येऊ शकते, असे अनुमान त्यांनी मांडले.

लॉकडाऊनमुळे देशातील 80 हजार ते एक लाख मृत्यू आपण टाळू शकलो आहोत. गेल्या आठवड्यापर्यंत झालेल्या मृत्यूंवरून आपण दहा लाखांमागे दोन मृत्यू या प्रमाणावर पोहोचलो आहोत. ताप आणि श्‍वसनाच्या गंभीर आजाराची लक्षणे लवकर ओळखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे देशातील मृत्यू दर कमी राखता येऊ शकेल. त्यामुळेच जर देशाने मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन केले आणि वैद्यकीय सेवा अतिसतर्क ठेवल्या तर आपण करोनाबळींचा आकडा साडे 7 ते 8 हजार मृत्यूंवर रोखू शकू, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.