पिंपरी – महापालिकेच्या ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यातून दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये महिला रस्त्यावर पडली. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या मोटारीने तिला उडविले. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ शनिवारी (दि. 18) सायंकाळी घडली.
सरस्वती सुरेश शिंदे (वय 56, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती या आपला मुलगा गणेश यांच्यासोबत एका आजारी नातेवाईकाची भेट घेण्यासाठी दुचाकीवरून प्राधिकरणात चालल्या होत्या. त्यांची दुचाकी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ आली असता त्याठिकाणी खोदलेल्या खड्ड्यामध्ये दुचाकी घसरुन पडली. यामुळे सरस्वती या रस्त्यावर पडल्या. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेली कार सरस्वती यांच्या अंगावरून गेली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सरस्वती यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना वायसीएम रुग्णालयात नेण्यास सांगितले.
जबाबदारीची ढकलाढकली
स्मार्टसिटी अंतर्गत सीसीटिव्हीसाठी केबल टाकण्यासाठी शहरात सध्या खोदाई सुरू आहे. याबाबत स्मार्ट सिटीचे अशोक भालकर यांना विचारले असता आकुर्डी रेल्वेस्टेशनजवळ आमच्या विभागाचे काम सुरू नसून पालिकेचे काम सुरू असावे, असे सांगितले. या खड्ड्याची जबाबदारी कदाचित बीआरटीएसची असावी. बीआरटीएसचे विजय भोजणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या खड्ड्याबाबत हात झटकले. बीआरटीएसकडून आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ फुटपाथचे काम चालू असून खड्ड्याशी आमच्या विभागाचा संबंध नाही. दोन्ही विभागानेही ही जबाबदारी ढकलल्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये खड्ड्यांबाबत अद्यापही गांभिर्य नसल्याचेच समोर आले आहे.