सत्तेच्या लालसेतून कदमांच्या तोंडी परिवर्तनाची भाषा

नगरसेवक अशोक मोने; आ. शिवेंद्रसिंहराजेंमुळेच सातारा- जावळीचा सर्वांगिण विकास

सातारा – विधानसभेची निवडणूक जवळ आली की अनेकांना आमदारकीची स्वप्ने पडू लागतात. आज अखेर सातारा- जावळीतील जनतेसाठी एका रुपयाचेही काम केले नाही अशा अमित कदमांना सत्तेची लालसा सुटल्याने मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांवर कधीही तोंड न उघडलेले कदम आता परिवर्तनाची भाषा करु लागले आहेत. अमित कदमांचे मतदारसंघातील योगदान तरी काय, असा सवाल सातारा नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते व ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने यांनी केला आहे.

सातारा- जावळी मतदारसंघात विकासाचा झंजावात करुन मतदारसंघाचा कायापालट करणारे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच लोकप्रतिनिधी असणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघामध्ये आमचे नेते आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी विकासकामांच्या जोरावर जनतेचा विश्‍वास संपादन केला आहे. त्या विश्‍वासातूनच सातारा आणि जावळीतील जनतेने शिवेंद्रसिंहराजेंना भरभरुन प्रेम आणि आपुलकी दिली असून त्यामुळेच त्यांनी आमदारकी मिळवली आणि त्याच विश्‍वासाने ती टिकवली देखील आहे.

कोणाला कोणत्या घरात जन्माला घालायचे ही त्या परमेश्‍वराची इच्छा. मात्र राजघराण्यात जन्माला येऊनही आपल्या मनमिळावू स्वभाव, लोकांमध्ये मिळून मिसळून राहणे, तळागाळापर्यंत असणारा त्यांचा जनसंपर्क, प्रामाणिकपणे काम करण्याची वृत्ती आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यामुळे त्यांनी सर्वांचीच मने जिंकली आहेत. प्रत्येकाच्या सुखदुःखा: समरस होऊन प्रत्येकाच्या अडीअडचणीच्या प्रसंगी धावून जाणाऱ्या त्यांच्या स्वभावाची पारख जनतेने केलेली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कोणीही कितीही आटापिटा केला तरी, शिवेंद्रसिंहराजे भोसले हेच सातारा जावळी मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असतील, अले त्यांनी स्पष्ट केले.

शिवेंद्रसिंहराजे यांच्याविषयी टीकाटिपणी करणे एवढेच काम करणाऱ्या अमित कदमांचे आजवरचे कर्तृृत्व काय, असा सवाल उपस्थित करत श्री.मोने यांनी सातारा शहरातील किंवा सातारा आणि जावळी तालुक्‍यातील कोणत्या प्रश्‍नात लक्ष घालून तो सोडवण्याचा प्रयत्न केल्याचे एकतरी उदाहरण कदम अथवा त्यांच्या बगलबच्यांनी द्यावे आणि मगच परिर्वतनाबद्दल फुशारक्‍या माराव्यात, अशी टीका केली. कदम यांना भाजपमध्ये जाऊन दोन वर्ष झाली पण, त्यांच्या माध्यमातून विधानसभा मतदारसंघ सोडाच स्वत:च्या जिल्हा परिषद गटात तरी एखादे काम झाले आहे का, उलट विरोधी पक्षाचे सरकार असतानाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवून दाखवला आहे, असा दावा त्यांनी केला.

दुसऱ्यांवर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या कदमांनी आत्मपरिक्षण केले पाहिजे. त्यांचे वडील कै. गेणू कदम दहा वर्ष आमदार होते. मातोश्री आशालता कदम या जिल्हा परिषद सदस्या, महिला व बाल कल्याण समिती सभापती आणि जिल्हा बॅंकेच्या संचालिका होत्या, अशी टीका त्यांनी केली. आमदारकीच्या स्वप्नापायी सातारमध्ये जेवणावळी घालून युवावर्गाचे भवितव्य बरबाद करु पाहणाऱ्या कदमांनी परिवर्तनाची दिवास्वप्ने पाहू नयेत, असेही मोने यांनी म्हटले
आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)