अमेरिकेतील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर लसही ठरणार निष्फळ; वैज्ञानिकांनी व्यक्त केला अंदाज

न्यूयॉर्क : करोनाने संपूर्ण जग व्यापून टाकले आहे. कोरोनाविषयी रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच सर्वांच्या चिंतेत भर घालणारी एक बातमी समोर येत आहे. अमेरिकेमधील ओरिगॉन येथे ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या करोना विषाणूचे बदलेले स्वरुप म्हणजेच म्युटेड व्हेरिएंट आढळून आला आहे. हा विषाणू ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विषाणूची रचना ही दोन वेगवेगळ्या विषाणूंमधील रचना एकत्र येत झाली आहे. त्यामुळे यावर करोनाच्या लसीचा फारसा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
आरोग्यतज्ज्ञांनी या विषाणूसंदर्भात सर्वांनीच अधिक सावध राहण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिलं आहे. हा विषाणू वेगाने पसरण्याबरोबरच सतत त्यामध्ये बदल होत असल्याने यावर लस निष्प्रभ ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन वेगळ्या विषाणूंमधील रचनेपासून नव्याने तयार झालेली रचना असणाऱ्या विषाणूचा संसर्ग झालेला एकच रुग्ण आढळून आला आहे. मात्र यासंदर्भात जेनेटिक्समधील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या विषाणूचा आधीपासूनच फैलाव सुरु झालाय. हा विषाणू एकाच रुग्णात तयार झालेला नाही. ओरिगॉन हेल्थ अ‍ॅण्ड सायन्स युनिव्हर्सिटीचे ब्रायन ओ रॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू जगातील इतर भागांमधून इथे आलेला नाही. तर अचानक या नव्या प्रकारच्या विषाणूचा शोध लागालाय.” रॉक आणि त्यांचे सहकारी या नव्या व्हेरिएंटची निर्मिती कशी झाली यासंदर्भात सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिव्हेन्शनची मदत करत आहेत. संशोधनासंदर्भातील माहिती रॉक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी संस्थांसोबत शेअर केली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी वन वन वन सेव्हन या विषाणूचा वेगाने अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सामान्य करोना विषाणूपेक्षा हा नवा विषाणू अधिक वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच नव्या विषाणूमुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जातेय. ओरिगॉनमध्ये आढळून आलेल्या या नव्या प्रकारच्या विषाणूमध्येही म्युटेशन म्हणजेच बदल आढळून आलाय. हा बदल दक्षिण आफ्रीका, ब्राझील आणि न्यूयॉर्क शहरामध्ये पसरणाऱ्या करोनाच्या नव्या विषाणूमध्येही आढळून आला होता.

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या क्लीनिकल ट्रायल्समध्ये ईईके म्युटेशनमध्ये रोगप्रतिकारशक्तीला नुकसान पोहचत असल्याचे दिसून आलं. हा विषाणू सध्याच्या करोना लसीचा प्रभाव कमी करतो असंही यात दिसून आलं. करोनाची लस प्रभावशाली ठरणार असली तरी तिचा प्रभाव या नवीन विषाणूविरोधात तुलनेने कमी असेल. त्यामुळेच फाइजर-बायोएनटेक तसेच मॉडर्ना कंपनीने नव्या लसीच्या चाचण्याही सुरु केल्यात. ब्रिटनमधील ईईकेसोबत बी वन वन सेव्हनचं म्युटेशन दिसून आले आहे. हा बाब चिंताजनक असल्याचं संशोधक सांगत आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार ओरिगॉनमधील नवा विषाणू हा इथेच निर्माण झालेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.