लसीकरण केंद्रावर लाभार्थी पेक्षा सोबत येणाऱ्यांचीच गर्दी जास्ती

आपणही थोडा संयम पाळू शकतो का ?

– विवेकानंद काटमोरे 

हडपसर –  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहिमेवर भर दिला जात आहे. दरम्यान, विविध शहरात लसीच्या तुटवड्यामुळे प्रशासनाकडून विशेष नियोजन करण्यात येत आहे. त्याप्रमाणेच पुणे महापालिकेनंही पुणेकरांना लस देण्यासाठी नियोजन केले आहे.मात्र अद्यापही पुरेसा प्रमाणात लस उपलब्ध नसल्याने अडचणी येत आहेतच, परंतु या मान्य करून उपलब्ध लसीकरण बाबत नागरिकांनीच संयम पाळल्यास लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यास तसेच प्रत्येकाला योग्य ठिकाणी विनात्रास लस मिळण्यास मदत होईल का? अशी भावना व्यक्त केली जात आहे.

18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी शहरात सुरवातीला असलेली दोन केंद्र वाढवून ती आता सहा करण्यात आली आहेत. याशिवाय अपॉइंटमेंट किंवा स्लॉट बुकिंगसाठी वेळही ठरवून दिला आहे. त्यानुसार रात्री 8 वाजता लसीकरणासाठी अपॉईंटमेंट किंवा स्लॉट बुकिंग करता येऊ शकणार आहे. ज्यांनी अपॉइंटमेंट किंवा स्लॉट बुकिंग केले आहे. त्यांना त्या तारखेला व वेळेला संबधीत केंद्रावर लस मिळत आहे. तर 45 वर्षांवरील नागरिकांसाठी 111 केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात 101 केंद्रांवर कोविशील्ड तर 10 केंद्रांवर कोवॅक्सिन लस उपलब्ध असेल असे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.

तसेच कोविड संकेतस्थळावर १८ वर्षावरील नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करणे अनिवार्य असतानाही. अनेकजण उपलब्ध लसीकरण केंद्रावर येऊन चौकशी करत आहेत. अपॉइंटमेंट नसतानाही लसीकरण केंद्रावर येऊन कर्मचाऱ्यांना वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. 18 ते 44 वयोगटातील तरुण वर्ग हा सुशिक्षित आहे. सोशल माध्यमातून जोडलेला आहे. त्यावर लसीकरण मोहीम व त्यातील अपडेट पहात आहेत. तरीही प्रत्यक्ष केंद्रावर येऊन चौकशी केली जात आहे. विनाकारण गर्दी केली जात आहे, असे लसीकरण केंद्रावरील कर्मचारी सांगत आहेत.

तर 500 लसीचे डोस उपलब्ध असलेल्या लसीकरण केंद्रावर 500 किंवा 550 नागरिक अपेक्षित असताना अपॉइंटमेंट असलेल्या व्यक्ती सोबत एक किंवा दोन व्यक्ती येत असल्याने केंद्रावर व परिसरात गर्दी होत आहे. 500 लाभार्थी आणि प्रत्यक्ष 800 ते 1000 लोक या केंद्रावर आल्याने गर्दी होऊन बोजवारा उडत आहे. मग येथे सामाजिक अंतरही पाळले जात नाही. गरज नसतानाही उन्हात गप्पा मारत उभे राहतात. रांगेत उभे असताना अनेकदा लाभार्थी बरोबर सोबत आलेला व्यक्तीही उभा राहतो त्यामुळे या रांगा लांबच लांब जात आहेत.

यातही एखादा सोबतीचा व्यक्ती बाजूला जावून पुन्हा रांगेत गप्पा मारण्यास आल्यास मागील व्यक्ती गैरसमजातून वाद निर्माण करत आहेत. यातून तो वाद लस केंद्रावर उपलब्ध कर्मचारी वर्गापर्यंत जात आहे. मुळात अपॉइंटमेंट असलेल्या व्यक्तीला साधारणपणे एका तासाच्या आत लस मिळून तो घरी जात आहे. परंतु लाभार्थी आणि सोबत असलेल्या व्यक्ती यांनी संयम पाळल्यास लसीकरण केंद्रावर सुसूत्रता येण्यासाठी मदत होईल,असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे.

सोबत येणाऱ्या लोकांचीच गर्दी

आज मगरपट्टा चौकातील महापालिकेच्या आण्णासाहेब मगर रुग्णालयात 500 लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. येथे लस देण्याचे योग्य नियोजन करून काळजीही घेतली जात आहे. प्रत्यक्ष लस देण्याच्या ठिकाणी गर्दी होत नाही. परंतु बाहेर असलेल्या रांगेत ज्यांची अपॉइंटमेंट आहे त्यांच्या सोबत घरातील एक – दोन व्यक्ती किंवा मित्र येत असून ते गप्पा मारत उभे राहतात. त्यामुळे केंद्रावर गर्दी झाल्याचे दिसते. तेव्हा नागरिकांनी स्वतःच स्वयंशिस्त बाळगून काळजी घेतल्यास लसीकरण मोहीम यशस्वी होईल.

– हेमलता निलेश मगर
नगरसेविका

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.