गोरखपूर अर्भक मृत्यू प्रकरणातून सुटका झालेल्या डॉक्टरला अलीगढ मुस्लीम विद्यापीठात भाषण केल्याबद्दल अटक
लखनौ : अलीगढ मुस्लिम विद्यापीठात सुधारीत नागरीकत्व कायद्या (का) विरोधात भाषण केल्याच्या आरोपावरून अटक केलेले डॉ. काफील खान यांच्या कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायदा उत्तर प्रदेश पोलिसांनी लावला आहे. भाषण केल्याच्या आरोपात जामीन मिळाल्यानंतरही त्यांना मथुरा कारागृहात ठेवण्यात आले होते. डॉ. काफील खान यांच्यावर रासुका लावण्यात आला आहे. त्यामुळे ते कारागृहातच राहतील, असे अलीगढचे पोलिस अधिक्षक आकाश कुलहारी यांनी सांगितले.
राष्ट्रीय सुरक्षा अथवा कायदा सुव्यवस्थेला धोका असल्यास या कायद्यानुसार काही महिने तुरूंगात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ठेवता येते. उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने काफील खान यांना 12 डिसेंबर रोजी अलीगढ मुस्लीम विद्यापीठात भाषण केल्याबद्दल मुंबईतून 29 जानेवारी रोजी अटक केली होती. त्यांच्यावर अलीगढमधील सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. त्यांना अटक केल्यानंतर अलीगढला आणण्यात आले. तेथून त्यांची रवानगी मथुरेच्या कारागृहात करण्यात आली.
अलीगढ मुस्लीम विद्यापीठ आणि इदगाह मैदानावर झालेले आंदोलक अलीगढ कारागृहात असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
गोरखपूर येथल बीआरडी रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी झालेल्या 60 मुलांच्या मृत्यूबाबत या डॉक्टरला प्रथम ऑगस्ट 2017 मध्ये अटक करण्यात आली होती. सुमारे दोन वर्षानंतर त्यांची या प्रकरणातील सर्व आरोपातून मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. खान यांनी योगी सरकारने माफी मागण्याची मागणी केली होती.