पुणे – लोकसभा निवडणुकीपाठोपाठ आता विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) वापरले जाणार आहे. या सुविधेमुळे मतदाराला आपले मत कोणाला दिले हे प्रिंट स्वरूपात दिसणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमबाबत काही राजकीय पक्षांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ईव्हीएमवर दिलेले मत खरंच त्या मतदाराला जाते का, यावर शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. काही राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला होता. आता विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन जोडले जाणार आहे. त्यामुळे ईव्हीएमच्या चर्चेला पूर्णविराम मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यासाठी 13 हजार 593 बॅलेट युनिट, 9 हजार 952 कंट्रोल युनिट आणि 10 हजार 193 व्हीव्हीपॅट मशीन दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट मशीन असणार आहे. या सर्व ईव्हीएमची प्रथमस्तरीय चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे, असे अधिकाऱ्यांकडून यावेळी सांगण्यात आले.
..पण, स्लीप घरी नेता येणार नाही
व्हीव्हीपॅटमुळे मतदाराच्या आणि उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात येत आहे. ज्या उमेदवाराच्या समोरचे चिन्ह दाबले असेल ते चिन्ह आणि उमेदवाराचा अनुक्रमांक हे प्रिंट स्वरुपात व्हीव्हीपॅट मशीनवर सात सेकंद दिसणार आहे. त्यानंतर ही स्लीप कट होऊन या मशीनच्या बॉक्स मध्ये पडणार आहे. ही स्लीप मतदाराला घरी घेऊन जाता येणार नाही.