जीन्स्‌चा असाही वापर…

हल्ली एखाद्याच्या घरात “जीन्स्‌’ पॅन्ट नाही असे क्वचितच होते. लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण जीन्स्‌चा वापर करीत असतो. आता मुलीही यामध्ये आघाडीवर आहेत. आपण जीन्स्‌ वापरतो खऱ्या, परंतु काही कालावधीनंतर त्या जुन्या झाल्यावर त्याचं करायचं काय असा प्रश्‍न पडतो. अहो मग, याचा फार विचार करू नका, या जीन्सचा वापर तुम्हाला तुमच्या घर सजावटीसाठी करता येईल आणि तो दिसायलाही उत्तम असेल…

काही वर्षांपूर्वी जुने कपडे “भोवाऱ्या’ला देण्याची प्रथा होती. त्या कपड्यांच्या बदल्यात आपल्याला नवीन भांडी मिळायची. आता हा भोवारी पण क्वचितच दिसतो आणि नवीन भांडी तर अशीच येता-जाता लोकं घेत असतात. त्यामुळे जुन्या कपड्यांचा प्रश्‍न ऐरणीवर येतो आहे. बरं या जुन्या कपड्यांमध्ये जीन्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. कारण आजकालच्या तरुणांबरोबरच लहान मुलं आणि ज्येष्ठांनाही “जीन्स्‌’च कम्फर्टेबल वाटते. जीन्स्‌ ही वापरायला रफ अँड टफ असते आणि टिकतेही अधिक काळ.

परंतु शेवटी एकच कापड आपण किती दिवस घालणार, त्यालाही मर्यादा असतातच की. काही ठराविक कालावधीनंतर नवीन कपडे येतात आणि जुन्यांना अडगळीची जागा मिळते. जीन्स्‌च्या बाबतीत मात्र तुम्ही जरा हटके विचार करू शकता. याच जुन्या झालेल्या जीन्स्‌चा वापर करून तुम्ही घराला एक वेगळा लूक देऊ शकता. चला तर मग पाहूया, जुन्या जीन्स्‌चा वापर आपण कसा आणि कुठे करू शकतो.

सोफा-सेट : कुठल्याही घरात गेल्यावर सर्वात प्रथम दृष्टीस पडतो तो लिव्हिंग रूममधला सोफा. याच दर्शनिय भागात असणाऱ्या सोफ्याला तुमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या जीन्स्‌च्या कापडाचे कव्हर शिवता येईल.

पडदे : हल्ली नवीन फ्लॅटमध्ये बहुतांशवेळा खिडक्‍या मोठ्या असतात, त्यामुळे त्यांना पडदे लावणे अनिवार्यच असते. मग हे पडदे जर जीन्स्‌चे असतील तर किती भारी दिसेल ना… त्याचे कापड, रंग वेगळा असला तरी चालेल परंतु पडदा जीन्स्‌चा आहे म्हटल्यावर बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.

गालिचा : प्रशस्त फ्लॅटच्या आजच्या संस्कृतीमध्ये लिव्हिंग रूमच्या सजावटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्या रूममध्ये गालिचा पसरून एकप्रकारे अद्ययावत सजावट करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. अशा वेळी जीन्स्‌चा वापर करून हा गालीचा तयार करता येणे शक्‍य आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.