वॉशिंग्टन – चीन आणि रशिया या देशांनी आधुनिकीकरणाद्वारे स्वताची लष्करी व आर्थिक शक्ती वाढवली असून आपल्या या वाढत्या शक्तीचा वापर ते छोट्या देशांना धमकावण्यात आणि त्यांच्या स्वायत्ततेवर आक्रमण करण्यासाठी वापरत आहेत असा आरोप अमेरिकेने केला आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांनी हा आरोप केला आहे.
ऍटलांटिक कौन्सिलच्या थिंक टॅंक मध्ये बोलताना त्यांनी म्हटले आहे की, चीनने आपल्या वन बेल्ट वन रोड प्रकल्पाचा वापर अशिया आणि युरोप तसेच आफ्रिका खंडामधील मधील आपली आर्थिक शक्ती वाढवण्यासाठी सुरू केला आहे. जगभर आपल्या लष्कराचे अस्तित्व निर्माण करण्यासाठीच त्यांना या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा वापर करायचा आहे असे ते म्हणाले.
चीन आणि रशिया हे दोन्हीं देश आंतराष्ट्रीय कायद्यांचा भंग करून आपल्या बाजूने जागतिक समतोल वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोपहीं त्यांनी केला. चीनने दक्षिण चीन समुद्रात आपली लष्करी ताकद वाढवली आहे. रशियाने क्रिमीयाला आपल्या देशाशी जोडून घेण्याचा प्रयत्न चालवला असून त्यांनी पुर्व युक्रेन मध्येही अतिक्रमण केले आहे.
या घटना त्यांच्या आक्रमकपणाच्या द्योतक आहेत असे ईस्पर यांनी नमूद केले. शस्त्र शक्तीच्या बळावर अन्य छोट्या देशांवर त्यांची दडपशाहीच सुूरू असल्याचा आरोपहीं त्यांनी केला. ब्रम्हदेश, कंबोडिया अशा देशांना आपल्या कर्जाच्या बोज्या खाली दाबून टाकून त्यांचे सार्वभौमत्व हिराऊन घेण्याचा प्रयत्नही चीनकडून पद्धतशीपणे सुरू आहे असे ते म्हणाले.