झोपडपट्टी, वस्त्यांमधील रुग्णांची संख्या वाढतेय
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणांमध्ये करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागल्याने शहरावरील करोनाची छाया आणखी गडद झाली असून प्रशासनापुढील आव्हान आणखी वाढले आहे. योग्य पद्धतीचा अवलंब आणि नियमांचे काटेकोर पालन न केल्यास करोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सापडलेले सर्वाधिक रुग्ण हे दाट लोकवस्तीमधील आहेत. रुपीनगर, त्रिवेणीनगर, कोयनानगर, खराळवाडी, ओटास्कीम, मोशी, दिघी, दापोडी, पडवळनगर आदी परिसरातील आहेत. बैठी घरे, दाट लोकवस्ती, राहण्याची अपुरी सुविधा, सार्वजनिक शौचालये, कडक उकाडा यामुळे सायंकाळी घराबाहेर होणारी गर्दी यामुळे करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्रिवेणीनगरमध्ये एकाच दिवशी तब्बल 12 रुग्ण एकाच दिवशी वाढल्यानंतर शहरातील भितीच्या वातावरणामध्ये आणखीनच भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्ट्यांची संख्या अधिक आहे. तब्बल 72 झोपडपट्ट्या असून, यामध्ये 7 ते 9 लाख नागरिक रहात आहेत. तर दहा लाखांच्या आसपास नागरिक हे वस्त्या, नगरे, बैठी मात्र छोट्या-छोट्या घरांमध्ये रहात आहेत. अनेक झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक व्यवस्थांच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा पुरवठा होत असल्याने सर्वच ठिकाणी गर्दी होत आहे. तर अपुऱ्या घरातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे मुश्किल बनले आहे. अशाच परिसरात करोनाने शिरकाव केल्यामुळे रुग्णांच्या संख्येत भर पडू लागली आहे.
झोपडपट्टी आणि दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडविले जात असताना काहीजण बेदकारपणे वागत असल्याचेही समोर आले आहे. त्यातच प्रशासनही चुका करत असल्याने शहरवासियांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत कडक नियम केल्यानंतरही या नियमांना हरताळ फासण्याची स्पर्धा अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. एका बाजुला प्रशासनाला सहकार्य करणारे लोक तर दुसऱ्या बाजूला नियम पायदळी तुडविणाऱ्यांची वाढती संख्या, त्यातच रुग्णांमध्ये होणारी वाढ याचा फटका किती दिवस सहन करायचा असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.