लाखणगाव येथील स्थिती : पिकांतही सोडली जनावरे
लाखणगाव (वार्ताहर) – कोबी पिकाला बाजारभाव नसल्याने कोबी सध्या जनावरांचा चारा म्हणून वापरले जात आहे. कोबीच्या उत्पादनासाठी मोठा भांडवली खर्च करुन पिकवलेल्या पिकांत जनावरे सोडावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे
कोबीला चार ते पाच रुपये किलो बाजारभाव मिळत असल्याने काढणी आणि वाहतूक खर्चही भागत नाही. कोबीची तोडणी, मजुरी, पिशवी, वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी कोबी पिकाची तोडणी थांबवली आहे. कोबी सध्या जनावरांचा चारा म्हणून वापरली जात आहे.
करोनाच्या भीतीमुळे अजूनच मागणी घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लाल गायी, शेळ्या-मेंढ्या, जनावरे कोबी पिकात सोडली आहेत. मोठा भांडवली खर्च करून पिकवलेल्या पिकात जनावरे सोडावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
पिंपळगाव येथील शेतकरी हरिदास पोखरकर माडीवाले यांच्या जनावरांच्या गोठ्यात चारा म्हणून कोबीचा वापर केला जात आहे. मार्च महिना असल्याने शेतकऱ्यांना सोसायटी, पतसंस्था, बॅंकेचे कर्ज भरण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे; परंतु हातातील पीक गेल्याने पैसे येण्याचे साधनच उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत असल्याचे पिंपळगाव येथील कृषीनिष्ठ शेतकरी ज्ञानेश्वर पोखरकर यांनी सांगितले.