वॉशिंग्टन – करोनाच्या प्रादुर्भावावरून अमेरिकेने चीनविरोधात आघाडी उघडली असून, करोनाचा उद्रेक चीनच्या वुहान शहरातून झाला आहे, हे सर्वांना लक्षात यावे, यासाठी सर्व देशांशी चर्चा करण्यात असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पोम्पिओ यांनी स्पष्ट केले. तर, या महामारीच्या प्रादुर्भावाविषयी जगाची फसवणूक केल्याप्रकरणी चीनमधील कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरण्यात यावे, असे आवाहन करत रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हॅले यांनी “ऑनलाईन याचिके’वरून कॉंग्रेसला कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर टीका केल्यानंतर, आता त्यांच्या सहकाऱ्यांनीही चीनवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. वुहानमध्ये डिसेंबर 2019 मध्ये साथरोगाचा उद्रेक झाला. मात्र, चीनने त्याविषयी माहिती दडवली. कोरोनाचा फैलाव होत असतानाही त्याची माहिती दिली नाही, असाही चीनवर आरोप आहे. या साथीमुळे अमेरिकेत 45 हजाराहून अधिक जणांचे बळी गेले असून, अमेरिकी अर्थव्यवस्थेचेही मोठे नुकसान झाले आहे. यासाठी कारणीभूत सर्व घटकांवरील जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे, असे माइक पोम्पिओ यांनी म्हटले आहे.
सर्व देशांबरोबर चर्चा करत असल्याचे सांगताना पोम्पिओ म्हणाले, सर्व देशांच्या अर्थव्यवस्था सुरळीत व्हाव्यात, पुन्हा कार्यरत व्हाव्यात, यासाठी त्यांना मदत करण्यासाठी चर्चा करण्यात येत आहे. यातून जागतिक व्यापार पुन्हा सुरू व्हावा, ही अपेक्षा आहे.
चीनवर आरोप करताना ते म्हणाले, कोरोना विषाणूंचा उगम वुहानमध्येच झाला आणि चीन सरकारला ही गोष्ट डिसेंबरमध्येच माहीत होती, ही गोष्ट सर्व देशांना माहीत व्हावी, आम्ही सर्व देशांबरोबर चर्चा करणार आहोत. जागतिक आरोग्य संघटनेचे आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनाची अंमलबजावणी करण्यामध्ये चीनला अपयश आले आहे. तसेच, कोरोनाची माहिती दडवण्यासाठीही चीनने अनेक गोष्टी केल्या आहेत.
कोरोनाच्या साथीची खोटी माहिती दिल्याबद्दल चीनच्या कम्युनिस्ट सरकारला जबाबदार धरण्याचे आवाहन करत अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्या निकी हॅले यांनी ऑनलाइन याचिका सुरू केली आहे. स्टॉप कम्युनिस्ट चायना असे या याचिकेचे नाव असून, त्यावर कालपर्यंत हजार जणांनी सह्या केल्या होत्या. या याचिकेवर किमान एक लाख जणांच्या सह्या घेण्याचे लक्ष्य हॅले यांनी ठेवले आहे.