वॉशिंग्टन – अमेरिकेत सध्या करोनाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे येत्या नोव्हेंबर महिन्यात होणारी अध्यक्षीय निवडणूक पुढे ढकलली जाते काय अशी शंका उपस्थित केली जात असतानाच अध्यक्ष ट्रम्प यांनी ही निवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता नाही असे म्हटले आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियाही बदलण्याची सुचना केली गेली आहे. ईमेल द्वारे मतदान करण्यास अनुमती दिली जावी अशी मागणी पुढे होत आहे. पण अध्यक्ष ट्रम्प यांनी हा प्रस्तावही फेटाळला असून ईमेल द्वारे होणाऱ्या मतदानात मोठ्या प्रमाणात फसवणूक होण्याची शक्यता असल्याने लोकांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच मतदान केले पाहिजे व मतदार ओळखपत्रांच्या आधारेच हे मतदान घेतले जावे असा आग्रह धरला जात आहे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
ज्यांना मतदानाच फसवणूकच करायची आहे ते लोक मतदार ओळखपत्राच्या आधारे मतदानाला विरोध करीत आहेत. पण या निवडणुकीत मतदार ओळखपत्राच्याच आधारे निवडणूक घेतली गेली पाहिजे असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.अमेरिकेत सध्या मतदार ओळखपत्राच्या बाबतीत विविध राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत अंमलात आहे.
काही राज्यात ही पद्धत आहे तर काही राज्यांनी ओळखपत्राची सक्ती काढून टाकली आहे. करोनामुळे उद्भवलेल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलावी आणि त्यात मतदारांना ईमेलद्वारे मतदान करण्यास अनुमती दिली जावी अशी मागणी अनेक विरोधी खासदारांनीही केली आहे. पण ट्रम्प यांनी त्यास स्पष्ट नकार कळवला आहे.