दंडाचा आततायीपणा; करोनाचा धोका

पोलिसांबरोबर संभाषण करताना बाधा होण्याची शक्‍यता


यंत्रणेच्या सुरक्षेसाठी ऑनलाइन दंड आकारणे शक्‍य 

पुणे – मास्क न वापरता रस्त्यांवरून फिरणाऱ्यांवर महापालिकेने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे. परंतु, हा दंड आकारताना पोलिसांबरोबर नागरिकांशी बराच वेळ संभाषण तसेच वादावादीही होत आहे. यातून “माऊथ स्पार्कल’ उडून करोनाची बाधा होण्याचा धोका आहे. यामुळे दंड रोख रकमेच्या स्वरूपात घेण्यापेक्षा तो ऑनलाइन आकारावा, अशी मागणी केली जात आहे. करोनाचा प्रसार टाळण्यासाठी वाहनांवरील कारवाईतील दंडवसुली ज्या ऑनलाइन पद्धतीने केली जाते तीच पद्धत याठिकाणी वापरता येऊ शकते, असा पर्याय यातून पुढे आला आहे.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने जे सुरक्षेचे नियम लागू केले आहेत त्यामध्ये मास्क वापरणे हा महत्त्वाचा नियम आहे, असे असताना अनेकजण वाहन चालवताना, रस्त्याने चालताना, चारचाकीतून एकपेक्षा अधिक व्यक्ती जाताना मास्क वापरत नाहीत असे दिसून आले आहे.

आरोग्य निरीक्षक आणि नेमलेल्या पथकांमार्फत अशा व्यक्तिंविरूद्ध कारवाई केली जात आहे. हा नियम मोडल्यास 500 रुपये जागेवर दंड आकारला जात आहे. परंतु, नागरिक पूर्ण दंड भरण्याला तयार होत नाहीत, “एवढेच पैसे आहेत पाकिटात, तेवढेच आहेत’ अशी कारणे देत कारवाईपासून पळ काढताना दिसतात. काही वेळा पथकाकडूनही अरेरावीचे प्रकार होतात. ज्या करोनापासून बचावाकरिता हे सगळे केले जात आहे, त्याचाच फैलाव होण्याचा धोका अधिक आहे.

विशेषत: चारचाकी वाहनातून प्रवास करणारे नागरिक सूज्ञ असतात. त्यांनाही त्यांच्या सुरक्षेची काळजी असते, अशावेळी सावज टिपल्या सारखी कारवाई करण्याचे प्रकार घडतात व समंजसपणाला तिलांजली देण्याचे प्रकारही पथकाकडून घडत असल्याचे दिसून येते. नियम पाळण्याचे भान नागरिक ठेवत असल्याचे दिसून येत आहे. अंमलबजावणी करणाऱ्यांनीही आततायीपणा टाळावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यातूनच ऑनलाइन दंडाचा पर्याय पुढे येत आहे.

दरम्यान, पोलिसांकडून वाहनांवरील कारवाईसाठी जी ऑनलाइन पद्धत वापरली जाते ती येथेही वापरता येऊ शकेल, असे महापालिकेतील अतिक्रमण नियंत्रण विभाग प्रमुख माधव जगताप यांनी सांगितले. वाहनचालकांचा नंबर घेऊन त्यावर दंडाची आकारणी होऊ शकेल. परंतु, जे पादचारी आहेत आणि त्यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे, त्यांच्याकडून ऑनलाइन दंड कसा घ्यायचा? सगळ्यांकडेच एटीएम कार्ड असेल किंवा काय हे सांगता येत नाही. त्यामुळे त्याबाबत विचार करावा लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

वाहतूक शाखेकडून दुजोरा…
वाहतूक शाखेकडून वाहन क्रमांकाचा फोटो काढून किंवा सीसीटीव्हीद्वारे कारवाई करत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना “ई-चलन’ आकारण्यात येते. यामुळे नागरिकांना ऑनलाइन दंड भरता येतो. याच धर्तीवर पोलीस आणि नागरिकांमधील संपर्क टाळण्यासाठी पोलिसांनी ऑनलाइन दंड आकारावा, याबाबत वाहतूक शाखेकडूनही दुजोरा दिला जात आहे.

विनामास्क वाहन चालवणाऱ्या नागरिकांवर कारवाई महापालिकेच्या अखत्यारित करण्यात येते. पालिकेकडून वाहतूक शाखेला दंड आकारण्याची परवानगी दिली आहे. वाहनचालकांना ऑनलाइन दंड आकारण्यात येऊ शकतो. वाहतूक विभागाची ऑनलाइन दंड आकारण्याची यंत्रणा वेगळी असून ऑनलाइन दंड आकारायचा असल्यास यासाठीची यंत्रणा तयार करावी लागेल. याबाबत येत्या काळात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबतचा अभ्यास करता येऊ शकेल.
– डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्‍त (वाहतूक)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.