उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनाविला 15 हजारांचा दंड
मुंबई : राज्यात फोफावणाऱ्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयात केवळ तातडीच्या याचिकांवर सुनावणी घेण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही याचिकेची तातडीने सुनावणी घेण्याचा आग्रह करणाऱ्या याचिकाकर्त्याला उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला आहे.
यावेळी संताप व्यक्त करत वेळ आणि गर्दी वाढू नये, म्हणून नोटीस जारी केली असतानाही अशा प्रकरणांचा उल्लेख का केला जातोय?, असा सवाल करत याचिकादाराला पंधरा हजार रुपयांचा दंड सुनावला. तसेच दंडाची रक्कम सेंट ज्यूडस इंडिया चाईल्ड केअर सेंटरला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
तर न्यायालयातील गर्दी टाळण्यासाठी न्यायमूर्ती ए. के. मेनन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिका सादर करण्याची अभिनव सूचनाही जारी केली.
दरम्यान, न्यायालयात न येता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे याचिका सादर करण्यासाठी न्यायालयच्या नव्या इमारतीतील कोर्ट रूम क्रमांक 16 ब मध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वकिल त्यांच्या घरातून किंवा कार्यालयातूनही याचा लाभ घेऊ शकतात. एका व्हिडीओ सॉफ्टवेअरमार्फत ही सुविधा उपलब्ध आहे. त्यासाठी पिन क्रमांक, पासवर्ड व त्यासाठीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.