गुंता – मीमांसा टोकाच्या पावलाची

के. श्रीनिवासन

तेलंगणमध्ये बारावीचा निकाल लागल्यानंतर आठवडाभरात 18 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. विशेष म्हणजे, हा तांत्रिक दोषांचा परिपाक असल्याचे उघड झाले आहे. सॉफ्टवेअरमधील दोषांमुळे निकालांमध्ये अनेक ब्रह्मघोटाळे झाले. जे विद्यार्थी परीक्षेला हजर होते, त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आले. यंत्रणांमधील दोष पुढील पिढीसाठी किती घातक ठरू शकतात, हे तर या उदाहरणातून दिसतेच. परंतु मुलांकडे केवळ अपेक्षा ठेवून पाहण्याची आईवडिलांची वृत्तीही मुलांना टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडते, हेही यावरून स्पष्ट होते.

लंगणमधील शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचे निकाल नुकतेच जाहीर केले. निकाल लागून आठवडा उलटून गेला आहे; मात्र निकाल लागल्यापासूनच सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या अद्याप थांबलेल्या नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माध्यमांच्या वृत्तांतांनुसार, परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यामुळे तेलंगणमध्ये गेल्या आठवडाभरात अनेकांनी आत्महत्या केल्या असून, आतापर्यंत आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 18 वर पोहोचली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना तेलंगणमध्ये गेल्या चार वर्षांपासून घडत आहेत; परंतु यंदा आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये निकालानंतर आठ विद्यार्थ्यांनी निकालानंतर आत्महत्या केली होती. सर्वांत दुःखद बाब अशी की, अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणा मुळे अनेक घरांमधील मुले हकनाक बळी पडत आहेत. कोणतीही शहानिशा न करता निकाल जाहीर केल्यामुळे विद्यार्थी अचानक नैराश्‍याच्या गर्तेत अडकतात आणि आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात, असे दिसून आले आहे. अनेक विद्यार्थ्यांची अशी तक्रार आहे की, त्यांनी परीक्षा दिली होती; मात्र ते परीक्षेत अनुपस्थित असल्याचे दर्शविण्यात आले आहे. काही विद्यार्थ्यांची तक्रार अशी आहे की, अकरावीत ज्या विषयांमध्ये त्यांना चांगले गुण मिळाले, त्याच विषयांमध्ये बारावीला मात्र त्यांना नाममात्र गुण मिळाले आहेत.

अनेकांना कमी गुण मिळाल्याने अनुत्तीर्ण दर्शविण्यात आले असून, वस्तुतः त्यांना उत्तीर्ण होण्याच्या मर्यादेपेक्षा कितीतरी अधिक गुण असल्याचे नंतर लक्षात आले आहे. आपल्याला भरपूर गुण मिळण्याची खात्री असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याइतकेही गुण मिळत नसल्यामुळे मुलांच्या मनात शंका निर्माण झाली असून, ती योग्यच आहे. तेलंगणमधील मनचेरियल भागातील एका विद्यार्थिनीला एका विषयात शून्य गुण देण्यात आले होते. वस्तुतः हीच विद्यार्थिनी गेल्या वर्षी जिल्ह्यात पहिली आली होती. ज्यावेळी या विद्यार्थिनीची उत्तरपत्रिका पुन्हा तपासण्यात आली, तेव्हा तिला 99 गुण मिळाले. अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसून आल्यामुळे राज्य सरकारने चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. मूल्यांकनात चुका होत असल्याचे मंत्रालयानेही मान्य केले आहे. एवढेच नव्हे तर या गंभीर घटनांची दखल राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही घेतली असून, राज्य सरकारला नोटीस धाडली आहे. अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्‌ध्वस्त व्हावे किंवा विद्यार्थ्यांनी ते संपवून टाकावे, ही बाब खरोखर दुर्दैवी आणि संतापजनक आहे.

देशाच्या अनेक भागांमधून परीक्षांच्या निकालावेळी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. कधी-कधी मनाजोगे गुण न मिळाल्याने तर कधी-कधी पालकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नसल्यामुळे विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. परंतु केवळ परीक्षापद्धतीतील दोषांमुळे आणि बेजबाबदारपणामुळे इतक्‍या विद्यार्थ्यांचे जीव जावेत, हे संतापजनक आहे. तेलंगण राज्यात यावर्षी 9.74 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील 3.50 लाख विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकलेले नाहीत. राज्य सरकारने यावर्षी परीक्षेसाठी नामांकन आणि निकाल यासाठी ग्लोबलेना टेक्‍नॉलॉजीज्‌ या खासगी कंपनीबरोबर करार केला होता. या कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक दोष असल्यामुळे भलतेच निकाल लागले, असे सांगण्यात येत आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या म्हणण्यानुसार, या खासगी कंपनीने हजारो विद्यार्थ्यांना नापास केले आहे. दुर्दैवाची बाब अशी की, हा भोंगळ कारभारच अनेक विद्यार्थ्यांचे बळी घेणारा ठरला. तांत्रिक दोषांमुळे कोवळ्या जिवांनी मरणाचा मार्ग पत्करला.

प्रशासनाच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे उलट-सुलट निकाल लागल्याच्या घटना जवळजवळ सर्वच राज्यांत अधूनमधून घडत असतात. उत्तरपत्रिकांचे फेरमूल्यांकन करण्यासाठी अर्ज दिल्यास अनेक विद्यार्थ्यांचे गुण वाढवून येतात, असेही पाहायला मिळते. अशा स्थितीत प्रश्‍न असा निर्माण होतो की, मुळात चूक होतेच कशी? खरे तर अशा घटना विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्‍वास डळमळीत करतात. विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या आपल्या शिक्षण पद्धतीची निष्पक्ष आणि न्यायोचित जबाबदारी निश्‍चित असल्याखेरीज परीक्षा आणि निकाल याला अर्थच काय उरतो? वास्तविक, अशा चुका म्हणजे आपल्या शिक्षण व्यवस्थेतील असंवेदनशीलता आणि भोंगळपणाचा परिणाम होत. एवढेच नव्हे तर केवळ आकड्यांचे खेळ आणि स्पर्धेत प्रथम येण्यासाठी केल्या जाणाऱ्या धडपडीपुरतीच आपली शिक्षण व्यवस्था सीमित झाली आहे. केवळ शर्यतीला महत्त्व आल्यामुळे शिक्षणाचा खरा हेतू दूरच राहतो. त्यामुळेच परीक्षेच्या निकालात थोडाबहुत ढिलेपणा घडला तरी त्याचा परिणाम इतका गंभीर होतो आणि मुले टोकाचे पाऊल उचलायला मागे-पुढे पाहत नाहीत.

वस्तुतः मुलांचा सर्वांगीण विकास हे शालेय शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे. मुलांना आपल्या मनपसंत अभ्यासक्रमास प्रवेश मिळविण्यात अडचणी येता कामा नयेत. जीवनाशी निगडित अडचणींचा मुकाबला करण्यासाठी नैतिक बळ कसे मिळवायचे, याचे शिक्षण त्यांना शाळेत मिळायला हवे. त्यांचे नीतिधैर्य दृढ व्हायला हवे. मेहनत आणि योग्य मार्गदर्शन या आधारे मुलांचे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण व्हायला हवे. नव्या पिढीने जीवनातील चढउतारांचा मुकाबला करताना धैर्य आणि आपल्या क्षमता यांवर विश्‍वास ठेवून वाटचाल करावी, इतके बळ त्यांना मिळायला हवे. परंतु आपल्या शिक्षण व्यवस्थेचा कमकुवतपणा हाच आहे की, ही व्यवस्था ना मुलांना नोकरी, रोजगार मिळवून देते, ना त्यांना नैतिकदृष्ट्या सुदृढ बनवते. उलट, स्पर्धेचा बागूलबुवा करून ठेवल्यामुळे परीक्षेच्या निकालांचा किंवा त्यात झालेल्या घोटाळ्यांचा एवढा सखोल परिणाम मुलांच्या मनावर होतो की, मुले स्वतःला पराभूत समजू लागतात.

अशा स्थितीत पालकसुद्धा मुलांना बळ न देता स्पर्धेची गणिते डोळ्यासमोर ठेवून उलट मुलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. त्यामुळेच या मुलांनी परीक्षेच्या निकालांमध्ये झालेल्या गोंधळातून स्वतःला पराभूत मानले आणि टोकाचे पाऊल उचलले. आपली शिक्षण व्यवस्था वर्षानुवर्षे अनेक विसंगतींमधून वाटचाल करीत आहे, हे रोकडे वास्तव आहे. परिणामी, कोणताही नवविचार, धोरण किंवा तांत्रिक बदल झाल्यास आधीच पाया अस्तव्यस्त असलेल्या व्यवस्थेचा भोंगळपणा अधिक वाढतो. तांत्रिक दोषांमुळे निकाल तयार करण्यात झालेल्या चुका यासुद्धा बदल स्वीकारताना पुरेसे गांभीर्य आणि जबाबदारीची जाणीव नसल्याचाच परिणाम होत.

आपल्याकडील शैक्षणिक आकृतिबंध पाहता, परीक्षा मुळातच तणावाखाली होतात, असे दिसून येते. शिक्षणसंस्थांपासून सामाजिक वातावरणापर्यंत सर्वत्र मुलांवर अधिक गुण मिळविण्याचा दबाव असतो. परंतु तेलंगणच्या उदाहरणात चांगले गुण मिळविणारे विद्यार्थीसुद्धा यंत्रणेतील दोषांमुळे स्वतःला पराभूत समजून या जगातून निघून गेले. परीक्षेच्या निकालादिवशी आपल्याकडील कुटुंबांमध्येही मुलांकडे केवळ अपेक्षापूर्ण नजरेने पाहिले जाते, हेही दुर्दैवच होय. यश किंवा अपयश कसे स्वीकारायचे, यासाठी मुलांना मानसिक पातळीवर तयारच केले जात नाही. घरातील ज्येष्ठ मंडळी स्वतःमध्ये असा बदल घडवून आणण्यास तयारच नसतात. याच कारणामुळे निकाल अपेक्षित लागला नाही, तर मुलांमध्ये नैराश्‍याची भावना येते. हाच तणाव अनेकदा आत्महत्यांसारख्या गंभीर कृत्यांना जन्म देणारा ठरतो.

आपल्या देशात 15 ते 29 वर्षे वयोगटातील व्यक्तींचे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि अपेक्षा ही एकच गोष्ट याच्या मुळाशी आहे. अशा परिस्थितीत पालकांनी सजग आणि मुलांना सहकार्य करणारे मित्र बनण्याची आत्यंतिक गरज आहे. यंत्रणेनेसुद्धा आपल्या पुढील पिढीच्या भविष्याशी खेळ होणार नाहीत, अशा दृष्टीने बदल घडवून आणायला हवेत आणि तांत्रिक दोषांमुळे कुणाचे जीवन उद्‌ध्वस्त होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.