पंजाबमधील उलथापालथ थांबेना; आता नवज्योतसिंग सिद्धूंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

अमृतसर – पंजाबमधील राजकीय उलथापालथ थांबण्याचं नाव घेत नसून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सिद्धू यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपविण्यात आलं होतं. सिद्धू यांनी आपला राजीनामा काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सोपविला आहे.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे. कारण कॅप्टन अमरिंदर सिंग हे आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले असून तिथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमरिंदर सिंग भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच सिद्धू यांच्या मंजुरीनंतरच कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेण्यात आला होता. त्यानंतर दलित नेते चरणजीत सिंग चन्नी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्यात आलं होतं.

नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिलेल्या राजीनाम्यात म्हटलं की, मानुष्याचं पतन तडजोडीपासून सुरू होतं. मी पंजाबच्या भवितव्यासाठी आणि कल्याणाच्या मुद्दाशी तडजोड करू शकत नाही. त्यामुळे पंजाबच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. तरी काँग्रेसचे सेवा करत राहिल, असंही त्यांनी म्हटलं.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.