संसदेत अटलजींच्या तैलचित्राचे अनावरण

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहातल्या छायाचित्राचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज अनावरण झाले. उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संसद सदस्यांनी संसदेतील चर्चेचा स्तर उंचावून जनसामान्यांच्या मनात संसदेबद्दलची एक चांगली प्रतिमा निर्माण करावी असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज संसदपटूना केले. संसदेबद्दलची ही प्रतिमा खऱ्या अर्थाने माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली ठरेल असे उपराष्ट्रपती म्हणाले. संसदेतील दूरदर्शी हस्तक्षेप आणि आदर्श वागणुकीद्वारे वाजपेयी यांनी लोकशाहीची मुळे खोलवर रुजवली असे नायडू म्हणाले.

युती सरकारचे कार्य आणि प्रशासनाच्या माध्यमातून अटलजींनी लोकशाही मजबूत करण्याचा आदर्श समोर ठेवला असं ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग, ग्रामीण रस्ते, हवाई वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडवणारे अटल बिहारी वाजपेयी हे एक द्रष्टा नेता होते असे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी यावेळी काढले.

समाजातील वेगवेगळ्या स्तरातील तसेच वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीच्या लोकांना जोडण्याची अद्भुत कला वाजपेयी यांच्याकडे होती. ते एक अजातशत्रू होते असेही ते म्हणाले. तसेच उत्तम प्रशासक, उत्तम राजनेता, उत्तम व्यक्ती, उत्तम वक्ता, उत्तम संसंदपटू असे विविध गुण असलेले ते एक उत्तम व्यक्तिमत्व होते असे उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.

अटलजी आता छायाचित्र रुपाने संसद भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात सदैव राहणार असून, आपल्याला स्फुर्ती देत राहतील. अटलजींची प्रदीर्घ राजकीय कारर्कीद होती. त्यापैकी बराच काळ संसदेत विरोधक म्हणूनच त्यांनी भूमिका बजावली. जनहिताचे अनेक मुद्दे त्यांनी सातत्याने उपस्थित केले. अटलजींच्या ओघवत्या वाणीतल्या भाषणात जितकी ताकद होती, तेवढीच त्यांच्या मौनातही होती. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)