लाखणगावातील शेतकऱ्यांची केळी बाग उद्ध्वस्त लाखणगाव : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगाव येथे शुक्रवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी सावकार कोंडीबा दौंड यांची दोन एकर क्षेत्रावरील केळीची बाग पूर्णपणे भुईसपाट झाली. या घटनेत सुमारे २२०० केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्याचा अंदाजे दोन लाख रुपयांचा भांडवली खर्च वाया गेला आहे. तसेच अवघ्या एका महिन्यानंतर सुरू होणारे अपेक्षित उत्पन्नही हातातून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. सावकार दौंड यांनी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दोन एकर क्षेत्रावर केळीची लागवड केली होती. या लागवडीसाठी मल्चिंग पत्रिका व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात आला होता. केळीचे पीक चांगल्या अवस्थेत आले असून पुढील महिन्यात काढणी सुरू होणार होती. मात्र, अचानक आलेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण बाग आडवी झाली. इतर भाजीपाला पिकांना अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी केळी लागवडीकडे वळत आहेत. केळी पिकासाठी एकरी सुमारे एक लाख रुपये खर्च येत असल्याने मोठी गुंतवणूक करावी लागते. अशा परिस्थितीत झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानग्रस्त भागात पंचनामे सुरू असून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. वादळी वाऱ्याने लाखणगावातील पोल्ट्री भुईसपाट मंचर : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखनगाव येथील शेतकरी संदीप निवृत्ती मिंडे यांची सुमारे दोनशे फूट लांबीची पोल्ट्री शुक्रवारी सायंकाळी आलेल्या वादळ आणि अवकाळी पावसात पूर्णपणे भुईसपाट झाली. या दुर्घटनेत पोल्ट्रीमधील सुमारे साडेतीन हजार कोंबड्यांचा मृत्यू झाला असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेचार ते पाचच्या दरम्यान काठापूर बुद्रुक, पोंदेवाडी आणि लाखनगाव परिसरात उष्णतेमुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन वावटळ तयार झाली. या वावटळीमुळे अनेक घरांची पत्रे व कौले उडाली, गोठ्यांचेही नुकसान झाले. तसेच अनेक वीज खांब कोसळल्याने तीनही गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. संदीप मिंडे यांच्या पोल्ट्रीमध्ये सुमारे पाच हजार कोंबड्या होत्या. त्यापैकी विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे तीन हजार पाचशे कोंबड्यांचा शेड कोसळल्याने व पावसात भिजल्यामुळे मृत्यू झाला. पोल्ट्रीचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. याबाबत पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळुज यांनी शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. हेही वाचा : Satara : महसूल थकविणाऱ्या गाळेधारकांवर कारवाईच प्रतीक्षा; सातारा पालिकेचे दुर्लक्ष