चेन्नई -ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्या मक्कल निधी मय्यम (एमएनएम) पक्षाला तामीळनाडू विधानसभा निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. त्या नामुष्कीजनक पीछेहाटीनंतर एमएनएमचे उपाध्यक्ष आर.महेंद्रन यांनी गुरूवारी पक्षाला रामराम ठोकला. त्यामुळे त्या पक्षातील अस्वस्थता शिगेला पोहचल्याचे सूचित होत आहे.
कमल यांचा पक्ष मोठा गाजावाजा करून प्रथमच विधानसभा निवडणुकीला सामोरा गेला. मात्र, तो पक्ष एकही जागा जिंकू शकला नाही. एमएनएमचे क्रमांक एक आणि दोनचे नेते असणारे कमल आणि महेंद्रन यांनाही पराभव पत्करावा लागला. निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर त्या पक्षातील धुसफूस उफाळून आली आहे. त्यातून महेंद्रन यांनी राजीनामा देताना पक्षात लोकशाहीचा अभाव असल्याचे टीकास्त्र सोडले.
कमल यांची पक्ष चालवण्याची पद्धत योग्य नाही. त्यांचे मोजके सल्लागार पक्ष चालवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. त्यानंतर पलटवार करताना कमल यांनी महेंद्रन यांचा उल्लेख विश्वासघातकी म्हणून केला. महेंद्रन यांची पक्षातून हकालपट्टी निश्चित होती. आता पक्षाची साफसफाई झाली आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया त्यांनी दिली.