तेहरान – अमेरिकेने इराणविरोधात आर्थिक युद्ध पुकारल्यावर स्वतःला सुरक्षित समजू नये, अशा शब्दांमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी अमेरिकेला इशारा दिला आहे. जर्मनीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यंनी दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी दिलेल्या भेटीच्या पार्श्वभुमीवर परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावाद झरिफ यांनी या हा इशारा दिला आहे.
वर्षभरापूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरच्या 2015 च्या आण्विक करारातून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यापासून हा तणाव सुरू झाला आहे. अमेरिकेने इराणवर कठोर आर्थिक निर्बंधही लादले आहेत.
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हेको मास यांनी आणि युरोपातील अन्य देशांनी आण्विक करार अबाधित राखण्याचे आवाहन केले आहे. आर्थिक निर्बंध उठवण्यासाठी इराणने युरेनियमची समृद्धता मर्यादित राखणे गरजेचे आहे. मात्र ही अपेक्षा करतानाही काही मर्याद असल्याचे मास यांनी म्हटले आहे. आपण केवळ प्रयत्न करू शकतो. चमत्कार करू शकत नाही. अणु करार अपयशी होण्याचा धोका टाळण्याचा आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करू शकतो, असेही ते म्हणाले.
इराण विरोधातील आर्थिक युद्धाची घोषणा स्वतः ट्रम्प यांनीच केली आहे. हा तणाव कमी करायचा असेल, तर हे आर्थिक युद्ध थांबवणे हाच एकमेव उपाय आहे. आमच्याविरोधात कोणीही जरी युद्ध सुरू केले असले तरी युद्ध संपवणारा दुसराच असेल, असे झरिफ म्हणाले.