नोकरी गेल्यानंतर 180 दिवस अमेरिकेत राहू द्यावे
वाशिंग्टन: करोना व्हायरसमुळे अमेरिकेतील परिस्थिती भीषण झाली आहे. या ठिकाणी हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि लाखो लोकांना संसर्ग झाला आहे. त्यामुळे अमेरिकेतील बेकारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. याचा फटका अमेरिकेत एचवन- बीच्या आधारावर काम करणाऱ्या भारतीय कर्मचाऱ्यांना बसला आहे.
एचवन-बी व्हिसा असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अमेरिकेमध्ये नोकरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्याला दुसरी नोकरी शोधण्यासाठी त्याच्या कुटुंबियासह 60 दिवस अमेरिकेत राहता येते. जर या साठ दिवसांमध्ये या कर्मचाऱ्याला नवी नोकरी मिळाली नाही तर या कर्मचाऱ्याला भारतात परत यावे लागते. सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये बेकारीचा दर प्रचंड वाढला आहे. त्यामुळे अनेक कामगारांना कमी केले जात आहे. मात्र नवी नोकरी शोधण्यासाठी साठ दिवसाचा कालावधी पुरेसा नाही. तो 180 दिवसाचा करावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे.
10 हजार कर्मचाऱ्यांनी व्हाईट हाऊसला तसे पत्र पाठविले आहे. आणखी बरेच कर्मचारी तसे पत्र व्हाईट हाऊसला पाठविणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान आणि इतर कंपन्यांनीही या शक्यतेवर विचार करावा असे अमेरिकेच्या प्रशासनाला कळविले आहे.
या आठवड्यात अमेरिकेतील 33 लाख लोकांनी आपण बेकार असल्याचे जाहीर केले आहे. हा आकडा 47 लाखापर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जाते. अशा परिस्थितीमध्ये नोकरीवरून काढून टाकताना एचवन- बीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकर काढले जाते. कारण हे कर्मचारी अमेरिकेचे नागरिक नसतात.
या कर्मचाऱ्यांना बेकारी भत्ता किंवा इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नाही. या कर्मचाऱ्यांना कामावर ठेवलेल्या बहुतांश कंपन्यांनी असे सांगितले आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये जर कामगार कपात करावी लागली तर एचवन- बी व्हिसावरील कर्मचाऱ्यांना प्रथम काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यानी तशी मानसिक तयारी ठेवावी. या कर्मचाऱ्यांनी अमेरिकन प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेतील माहिती-तंत्रज्ञान यंत्रणा एचवन- बी व्हिासावरील कर्मचारी चालवित असतात. त्यामुळे हे कर्मचारी अर्थव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी अमेरिकेत राहणे गरजेचे झालेले आहे.
व्हीसाच रद्द करण्याची स्थानीकांची मागणी
दरम्यान अमेरीकेतील माहीती तंत्रज्ञान कर्मचाऱ्याच्या संघटनेने बेकारी वाढणार असल्यामुळे या वर्षी एच वन – बी व्हीसा रद्द करावा अशी मागणी ट्रम्प प्रशासनाकडे केली आहे. अमेरीकेचे नागरीक असलेल्याना आगामी काळात बेकारीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या वर्षी 60 हजार परदेशी नागरीकाना कामासाठीचा व्हासा देण्यापेक्षा अमेरीकेतील नागरीकाना तो राजगार मिळावा असे त्यानी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.