वॉशिंग्टन – जगभरात करोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या जवळपास 7 लाख 3 हजारांच्या आसपास पोहोचली आहे. तर या विषाणूची बाधा झालेल्यांची संख्या 2 कोटींच्या आसपास आहे. तर 11 लाख जण या विषाणूच्या संसर्गामधून बरे झाले आहेत, असे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात म्हतलेले आहे.
या विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव अमेरिकेत झाला असून तेथील रुग्णांची संख्या शनिवारी 50 लाखांच्यावर पोहोचली आहे. 50 लाख करोनाबाधितांचा टप्पा गाठणारा अमेरिका हा जगातील पहिला देश ठरला आहे. लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढत असल्याने अध्यक्ष ट्रम्प यांनी रिलीफ ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे. ज्यांचा रोजगार बुडाला आहे, अशांना आर्थिक मदतीती तरतूद या रिलीफ ऑर्डरमध्ये आहे.
तर ब्राझिलमध्ये करोनामुळे सर्वाधिक म्हणजे तब्बल 1 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेपाठोपाठ सर्वाधिक म्हणजे 30 लाखांपेक्षा अधिक बाधितांची संख्याही ब्राझिलमध्येच आहे. गेल्या 24 तासात ब्राझिलमध्ये 49 हजार नवीन रुग्ण सापडले तर 905 जणांचा मृत्यू झाला आहे. तेथील रुग्ण संख्या 50 हजार होण्यास तीन महिने लागले पण केवळ 50 दिवसात 50 ह्जार जणांचा मृत्यू तिथे झाला आहे. अजून करोनाची स्थिती आटोक्यात आलेली नाही, असे तज्ञांनी सांगितल्यानंतरही तेथील सार्वजनिक व्यवहार पुन्हा सुरू करण्याची तयारी अध्यक्ष बोल्सेनारो यांनी चालवली आहे.
दरम्यान काही देशांमधील करोना प्रादुर्भावाची स्थिती मात्र सुधारते आहे. न्यूझिलंडमध्ये गेल्या 100 दिवसात एकही करोना बाधित रुग्ण सापडलेला नाही. व्हिएतनाममध्ये आतापर्यंत करोनाची स्थिती आटोक्यात आहे. रविवारी नवीन 31 रुग्ण सापडल्याने तेथील रुग्णांची संख्या 841 झाली आहे. तर मृत्यूची संख्या 11 इतकीच आहे. देशातील बहुतेक बाधित रुग्ण दनांग शहरातील आहेत. क्युबामध्ये लॉकडाऊनला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेली आहे.
चीनमध्ये नव्याने करोनाबाधित सापडायला लागले आहेत. बाधितांच्या क्रमवारीत 31 व्या स्थानापर्यंत खाली गेलेल्या चीनला त्यामुळे पुन्हा एकदा करोनाची लाट येण्याची भीती वाटू लागली आहे.