ह्युस्टन – ट्रम्प प्रशासनाने ह्युस्टनमधील चिनी दूतावास बंद केल्यानंतर आज अमेरिकेचे प्रांतिय एजंट आणि विधी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या वाणिज्य दूतावासामध्ये प्रवेश केला. या दूतावासातील चिनी दस्तऐवज हलवण्यात आल्यावर आता इमारतीला अमेरिकेने स्वतःचे कुलुप लावले आहे. चीन आणि अमेरिकेतील तणाव अधिक वाढण्याची लक्षणे दिसत असताना या वाणिज्य दूतावासाला अमेरिकेने टाळे ठोकले आहे.
आर्थिक हेरगिरीच्या कारणावरून अमेरिकेने ह्युस्टनमधील चिनी वाणिज्य दूतावास 72 तासांच्या आत बंद करण्याचे आदेश या आठवड्यात दिले होते. वॉशिंग्टनमधील वकिलातीव्यतिरिक्त शिकागो, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को या अमेरिकेतील अन्य चार शहरातही चीनचे दूतावास आहेत. टेक्सासमधील ह्युस्टन येथील चिनी वाणिज्य दूतावासाचे कार्यालय 1979 मध्ये उघडण्यात आले होते.
गेल्या 40 वर्षांपासून अमेरिकेतील आर्थिक व्यवहारांची सूत्रे चीन या वाणिज्य दूतावासातून हलवत होता. मात्र शुक्रवारी संध्याकाळी हा दूतावास बंद केल्यानंतर या आर्थिक व्यवहारांचा धागाही तुटला आहे. अमेरिकेकडून दूतावास बंद करण्यासाठी दिलेली मुदत शुक्रवारी समाप्त झाली. त्यानंतर दूतावासाच्या बाहेरील पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचा ध्वज आणि मानचिन्ह खाली उतरविण्यात आले.
चिनी मुत्सद्दी कर्मचाऱ्यांनी ही इमारत रिकामी केल्यानंतर अनेक काळ्या एसयूव्ही, ट्रक, दोन पांढऱ्या व्हॅन आणि लॉकस्मिथची व्हॅन कंपाऊंडमध्ये घुसली. सुमारे एक तासानंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनीही इमारतीत प्रवेश केला आणि तेथील अग्निशामन यंत्रणा तपासली.