कोंढापुरी येथे अंत्यविधीची राख झाडाच्या मुळाभोवती
शिक्रापूर – कोंढापुरी (ता. शिरूर) येथे काही युवकांच्या संकल्पनेतून अंत्यविधीनंतर गोळा होणारी राख नदीत टाकून दिल्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी या व्यक्तीच्या नावे एखादे झाड लावून त्या झाडाच्या खड्डयात अंत्यविधीची राख टाकून त्या झाडाचे संगोपन त्यांच्या नातेवाईकांनी घेण्याचा निर्णय घेतला.
येथील महवितरण विभागाचे कर्मचारी रामेश्वर ढाकणे व पै. ऋषिकेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून नदी वाचवा अभियानअंतर्गत एक सप्टेंबर रोजी मयत झालेले ज्ञानेश्वर नारायण गायकवाड यांच्या अंत्यविधीची राख नदीत टाकल्यानंतर नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून ती राख स्वत:च्या घरासमोर खड्डा खोदून त्या खड्डयामध्ये एक बेलाचे झाड लावले. यावेळी माजी पोलीस अधिकारी शामराव गायकवाड यांच्या हस्ते झाड लावण्यात आले. यावेळी उपसरपंच आशीष गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, माजी कृषी अधिकारी विठ्ठल गायकवाड, शामराव गायकवाड, अरुण गायकवाड, सतीश गायकवाड, संजय गायकवाड उपस्थित होते. मयत व्यक्तीच्या स्मृती जागविण्यासाठी झाड लावले तर एक झाडसुद्धा वाचेल आणि नदीचे प्रदूषण थांबेल, असे मत रामेश्वर ढाकणे व पै. ऋषिकेश गायकवाड यांनी व्यक्त केले.