मोदींच्या मंत्रीमंडळातील केंद्रीय मंत्री बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वांत कमी वयाचे मंत्री निसिथ प्रमाणिक नागरिकत्वावरून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. ते बांगलादेशी नागरिक असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे.

अलिकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यामध्ये राज्यमंत्री म्हणून पश्‍चिम बंगालमधील भाजपचे खासदार प्रमाणिक यांची वर्णी लागली. त्यांच्याकडे महत्वाच्या गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. अवघे 35 वर्षे वय असल्याने ते चर्चेचा विषय ठरले. मात्र, प्रशंसेचा धुरळा ओसरण्याच्या आत ते संशयाच्या धुक्‍यात सापडले आहेत.

ते बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा करणारे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्याचा आधार घेऊन आसाम प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य रिपून बोरा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून चौकशीची मागणी केली आहे. प्रमाणिक यांच्याविषयीचा दावा खरा असेल तर परदेशी नागरिक केंद्रीय मंत्री बनणे ही बाब देशाच्या दृष्टीने अतिशय गंभीर आहे, असे बोरा यांनी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तात प्रमाणिक यांचे जन्मठिकाण म्हणून बांगलादेशातील हरीनाथपूरचा उल्लेख करण्यात आला आहे. कॉम्प्युटरविषयक पदवीसाठीचे शिक्षण घेण्यासाठी ते पश्‍चिम बंगालमध्ये दाखल झाले. पदवी प्राप्त केल्यानंतर ते प्रथम तृणमूल कॉंग्रेसचे सदस्य बनले.

त्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करून ते बंगालच्या कूचबिहार मतदारसंघातून लोकसभेवर निवडूनही गेले. निवडणूक प्रतिज्ञापत्रात हातचलाखी करून त्यांनी पत्ता म्हणून कूचबिहारचा उल्लेख केला. प्रमाणिक केंद्रीय मंत्री बनल्यानंतर त्यांच्या बांगलादेशातील गावातील ग्रामस्थांनी जल्लोष केल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी दाखवले.

प्रमाणिक यांच्या मोठ्या भावाची प्रतिक्रियाही वाहिन्यांनी प्रसारित केली, असे बोरा यांनी पत्रात नमूद केले आहे. प्रमाणिक यांचे जन्मठिकाण आणि नागरिकत्व आदींचे सत्य समजण्यासाठी पारदर्शकपणे चौकशी होणे गरजेचे आहे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

निकटवर्तीयांनी फेटाळले आरोप
प्रमाणिक यांच्या निकटवर्तीय सुत्रांनी ते बांगलादेशी नागरिक असल्याचे आरोप फेटाळले आहेत. प्रमाणिक हे देशभक्त भारतीय आहेत. ते भारतात जन्मले आणि वाढलेही. त्यांचे शिक्षणही भारतात झाले. त्यांच्यावरील आरोप निराधार आहेत. एखाद्या मंत्र्याच्या परदेशातील नातलगांनी जल्लोष केल्यास मंत्री काय करू शकतो, असा सवाल त्या सुत्रांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.