केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे आत्मनिर्भर भारतासाठी तरतूद – खा. सुजय विखे

नगर (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आत्मनिर्भर भारतासाठी समर्पित केलेला अर्थसंकल्प म्हणजे गावे, गरीब आणि शेतकरी यांच्यासह कृषी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने उचललेले महत्वपूर्ण पाऊल असून, या अर्थसंकल्पातून देशाच्या उज्ज्वल भविष्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे, खासदार डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यावेळी उपस्थित होते. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे आणि शिवाजीराव कर्डिले यांची समन्वय समिती स्थापन केली होती.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या बैठकीत पक्षविरहित निवडणुकीसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे सांगण्यात आले. कर्डिले हे समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांकडे गेले असतील, असे सांगत त्यासंदर्भात 21 तारखेला बोलेल असे त्यांनी सांगितले.

विखे म्हणाले, कोविड संकटानंतर अस्थिर झालेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी या अर्थसंल्पाकडे देशवासियांचे लक्ष होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे सर्वच स्थतरातून झालेले स्वागत महत्वाचे असून, देशाच्या संरक्षण व्यवस्थेबरोबच सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने उचललेली पावले समाजघटकांना आधार देणारे ठरणार आहेत. 

करोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला. भारतालाही त्याचा सामना करावा लागला, अशा परिस्थितीत आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासाठी नवे कर लावणे स्वाभाविक होते. 

मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही. तसेच महागाई दर देखील 5 टक्क्यांपेक्षा कमी आहे. रस्ते, वीज, पाणी, रेल्वे, मेट्रो, मालवाहतूक मार्गिका, बंदरे, विमानतळ अशा पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी मात्र, 7 लाख 54 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

मतदानानंतर गौप्यस्फोट करणार : विखे

जिल्हा बँकेच्या राजकारणात एकाकी पडलेले खा. डॉ. सुजय विखे हे रविवारी मतदानानंतर गौप्यस्फोट करणार आहेत. आपली सविस्तर भूमिका त्यादिवशी पत्रकारांसमोर मांडू, असे स्पष्ट करत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. माजी मंत्री शिवाजी कर्डिले हे भाजप समन्वय समितीचे प्रतिनिधी म्हणून मंत्री थोरातांना भेटायला गेले असतील असंही त्यांनी सांगितलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.